रामपूरमध्ये मध्यरात्री वाहन चोरी; तलाठी भीमराव सावळे यांची दुचाकी लंपास.
रामपूरमध्ये मध्यरात्री वाहन चोरी; तलाठी भीमराव सावळे यांची दुचाकी लंपास.
ग्रामस्थांत भीतीचे वातावरण.
राजुरा:- रामपूर ग्रामपंचायत हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या वाहन चोरीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भाऊजी ताजने यांच्या घरी भाड्याने वास्तव्यास असलेले तलाठी भीमराव सावळे यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सावळे यांनी आपली दुचाकी (क्र. MH 34 CD 3485) नेहमीप्रमाणे घरासमोर उभी करून रात्री विश्रांती घेतली होती. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी संधी साधून गाडी लंपास केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. सकाळी उठल्यानंतर गाडी जागेवर नसल्याचे लक्षात येताच परिसरात शोधाशोध सुरू केली तसेच शेजाऱ्यांकडे चौकशी केली परंतु गाडीचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
यानंतर त्यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. संशयित चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
दरम्यान या घटनेमुळे रामपूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अलीकडील काळात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पोलिस प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करण्याचे योग्य लॉकिंग व्यवस्था ठेवण्याचे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे.
या घटनेमुळे रामपूर ग्रामपंचायत परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत