Breaking News

दुर्गापूर पोलिसांनी उद्ध्वस्त केला वरवटच्या जंगलातील गावठी दारूचा अड्डा

 सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : अवैध दारू गाळणाऱ्यांविरोधात दुर्गापूर पोलिसांनी अत्यंत धाडसी पाऊल उचलत मौजा वरवट येथील जंगल परिसरात सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर मोठी धाड टाकली आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख १५ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दारू माफियांना मोठा दणका दिला आहे.

मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, वरवट गावच्या शिवारातील घनदाट जंगल परिसराचा फायदा घेऊन काही इसम छुप्या पद्धतीने गावठी हातभट्टी लावून दारूची निर्मिती करत होते. ही दारू आसपासच्या परिसरात विक्रीसाठी पाठवली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

माहिती मिळताच दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने जंगल परिसरात शोधमोहीम राबवली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी घटनास्थळावरून हातभट्टीसाठी लागणारे कच्चे रसायन (सडवा), तयार गावठी दारू, ड्रम आणि इतर साहित्य असा एकूण १,१५,६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. घटनास्थळावर असलेले हजारो लिटर रसायन पोलिसांनी जागीच नष्ट केले आहे.

या धडक कारवाईमुळे दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अवैध दारू निर्मिती आणि विक्रीमुळे गावातील शांतता धोक्यात येत असल्याने ग्रामस्थांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पसार झालेल्या आरोपींचा शोध सुरू आहे. "क्षेत्रातील कोणताही अवैध व्यवसाय खपवून घेतला जाणार नाही आणि यापुढेही अशा कारवाया अधिक तीव्र केल्या जातील," असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत