“फक्त पदवी नव्हे, उद्योगांसाठी सक्षम व्हा!”
आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य आणि शिस्तीशिवाय करिअर अशक्य : डॉ. अनिल चिताडे
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : आजच्या स्पर्धात्मक आणि वेगाने बदलणाऱ्या औद्योगिक युगात केवळ पुस्तकातील शिक्षण पुरेसे नसून विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, संवाद कौशल्य आणि उद्योगाभिमुख ज्ञान आत्मसात करणे अत्यावश्यक आहे, असा स्पष्ट आणि रोखठोक संदेश राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (RCOERT), चंद्रपूर येथे आयोजित पालक-शिक्षक मेळाव्यात देण्यात आला.
सरदार पटेल मेमोरियल सोसायटीद्वारे संचलित आरसीईआरटीच्या विद्युत अभियांत्रिकी विभागात आयोजित “द्वितीय पालक-शिक्षक मेळावा 2026” उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांच्या वर्तन, उपस्थिती, कौशल्य आणि करिअर तयारीचा सखोल आढावा यावेळी घेण्यात आला.
प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे यांनी विद्यार्थ्यांना थेट संदेश देताना सांगितले की, “आज उद्योगक्षेत्र झपाट्याने बदलत आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवण्यावर भर न देता आधुनिक तंत्रज्ञान, नेतृत्वगुण, टीमवर्क आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करणे गरजेचे आहे.”त्यांनी पालकांनाही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
मेळाव्यात प्रत्येक विद्यार्थ्याच्या अभ्यासातील अडचणी, विषयांतील कमकुवत भाग, वेळेचे नियोजन, नियमित अभ्यासाची सवय आणि डिजिटल साधनांचा योग्य वापर यावर पालकांसोबत थेट संवाद साधण्यात आला.
विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. राजेंद्र के. धात्रक यांनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीपासून प्रकल्प कार्य, प्रयोगशाळेतील कामगिरी, अंतर्गत मूल्यमापन आणि तांत्रिक उपक्रमांतील सहभागापर्यंत सविस्तर माहिती पालकांसमोर मांडली.
आजच्या काळात फक्त परीक्षाभिमुख शिक्षण उपयोगाचे राहिले नसल्याचे स्पष्ट करत, विद्यार्थ्यांनी कौशल्याधारित शिक्षण, संशोधन वृत्ती, नवोपक्रम आणि प्रॅक्टिकल ज्ञानावर भर देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
यावेळी शैक्षणिक व सहशैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नाविन्यपूर्ण आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
पालक प्रतिनिधी श्री. रविंद्र गनवीर आणि श्री. विनोद पेटकर यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक, तांत्रिक आणि सहशैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करत, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक-शिक्षक समन्वय महत्त्वाचा असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाला डॉ. सुभाष वाय. कामडी, प्रा. डी. बी. मेश्राम तसेच विद्युत अभियांत्रिकी विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. सकारात्मक आणि संवादात्मक वातावरणात पार पडलेल्या या मेळाव्यामुळे पालक आणि शिक्षक यांच्यातील विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत