Breaking News

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक दिलासा! आता नगरपंचायत क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाही नवोदयच्या ग्रामीण कोट्यातून प्रवेशाचा हक्क

सावली, गोंडपिपरी, पोंभुर्णासह हजारो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; 

ॲड. दीपक चटप, ॲड. बोधी रामटेके आणि ॲड. सिद्धार्थ चपळगावकर यांच्या प्रभावी युक्तिवादाला यश

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : देशभरातील नगरपंचायत क्षेत्रात राहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक आणि दिलासादायक निर्णय दिला आहे. जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेत नगरपंचायत क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाही ग्रामीण कोट्यातून प्रवेशासाठी पात्र ठरविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून, यामुळे महाराष्ट्रासह देशभरातील ग्रामीण स्वरूपाच्या नगरपंचायत भागातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण निवासी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत.

जवाहर नवोदय विद्यालय ही केंद्र सरकारची ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत, दर्जेदार आणि निवासी शिक्षण देणारी महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा उद्देश आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल ग्रामीण विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे हा आहे. मात्र, अनेक नगरपंचायत क्षेत्रे प्रत्यक्षात ग्रामीण स्वरूपाची असतानाही, केवळ प्रशासकीय वर्गीकरणामुळे तेथील विद्यार्थ्यांना शहरी मानून ग्रामीण कोट्याचा लाभ नाकारला जात होता. परिणामी, अनेक होतकरू आणि गुणवंत विद्यार्थी नवोदयच्या प्रवेशापासून वंचित राहत होते.

या अन्यायाविरोधात सर्वोच्च न्यायालयात ॲड. सिद्धार्थ चपळगावकर, ॲड. दीपक चटप आणि ॲड. बोधी रामटेके यांनी प्रभावी बाजू मांडली. त्यांनी सावली, गोंडपिपरी, पोंभुर्णा यांसारख्या नगरपंचायत क्षेत्रांतील विद्यार्थ्यांची सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थिती ग्रामीण भागाप्रमाणेच असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. केवळ नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण कोट्यापासून वंचित ठेवणे हे भारतीय राज्यघटनेतील समानतेच्या तत्त्वाच्या विरोधात असल्याचा ठोस युक्तिवाद त्यांनी केला.

या युक्तिवादाची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने नगरपंचायत क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाही ग्रामीण कोट्यातून प्रवेशासाठी पात्र मानण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांचे संरक्षण झाले असून, गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी अधिक व्यापक झाल्या आहेत.

या ऐतिहासिक निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, गोंडपिपरी, पोंभुर्णा यांच्यासह राज्यातील विविध नगरपंचायत क्षेत्रांतील हजारो विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयाच्या ग्रामीण कोट्यातून प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षण क्षेत्रातील हा निर्णय ग्रामीण व नगरपंचायत क्षेत्रातील विद्यार्थ्यांमधील कृत्रिम भेद दूर करणारा, समान संधी आणि शिक्षणाच्या घटनात्मक अधिकाराला अधिक बळ देणारा ठरणार आहे.

या निर्णयाचे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील विविध संघटनांकडून स्वागत करण्यात येत असून, ग्रामीण भारतातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत