मंजूर सीसी रस्ता डोंगरगावऐवजी टाटाकोहाळ येथे; प्रशासनावर सत्ताधाऱ्यांना पाठीशी घालण्याचा आरोप
निवेदनातून आत्मदहनाचा इशारा देऊनही दखल नाही; जिल्हाधिकाऱ्यां समोर आरिफ शेख यांची तक्रार
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर, जिवती : ग्रामपंचायत खडकी अंतर्गत डोंगरगाव येथे जनसुविधा योजनेतून मंजूर झालेल्या सीसी रस्त्याचे काम ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता दुसऱ्या ठिकाणी, टाटाकोहाळ येथे करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव यांनी मनमानी कारभार केल्याचा आरोप करत अल्पसंख्याक आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिवती तालुकाध्यक्ष आरिफ शेख यांनी यापूर्वी निवेदनाद्वारे आत्मदहनाचा इशारा दिला होता.
आरिफ शेख यांनी मंजूर झालेले काम ज्या ठिकाणी मंजूर झाले आहे, त्याच ठिकाणी म्हणजे डोंगरगाव येथेच करण्यात यावे, अशी मागणी केली होती. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करून सीसी रस्त्याचे काम टाटाकोहाळ येथे करण्यात आले. एवढेच नव्हे तर संबंधित कामाचे बिलदेखील अदा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची तक्रार करूनही जिवती पंचायत समिती प्रशासन तसेच जिल्हा परिषद प्रशासनाने कोणतीही ठोस दखल घेतली नाही. उलट संबंधित अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने उभे राहून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही आरिफ शेख यांनी केला.
दिनांक ३० जून २०२६ रोजी चंद्रपूर जिल्हाधिकारी जिवती तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता, पाटण येथे त्यांची भेट घेऊन आरिफ शेख यांनी हा संपूर्ण प्रकार कथन केला. मंजूर कामाचे ठिकाण बदलणे, संबंधितांवर कारवाई न होणे आणि प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच मंजूर कामांमध्ये पारदर्शकता राखावी, अशी मागणी आता परिसरातील नागरिकांकडूनही होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत