स्वस्त धान्य दुकानात मका वाटप बंद करा, गहू वाटप सुरू करा; सामाजिक कार्यकर्ते उद्धव गोतावळे यांची मागणी
स्वस्त धान्य दुकानात मका वाटप बंद करा, गहू वाटप सुरू करा; सामाजिक कार्यकर्ते उद्धव गोतावळे यांची मागणी
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : जिवती हा अतिदुर्गम, आदिवासी व डोंगराळ तालुका असून येथील बहुतांश नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. येथील शेतकरी प्रामुख्याने निसर्गावर अवलंबून शेती करत असल्याने त्यांचे उत्पन्न अनिश्चित असते. अशा परिस्थितीत शासनाने सर्वसामान्य जनतेच्या अन्नसुरक्षेचा विचार करून स्वस्त धान्य दुकानांमधून मका वाटप बंद करून त्याऐवजी गव्हाचे वाटप करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उद्धव गोतावळे यांनी केली आहे.
उद्धव गोतावळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या स्वस्त धान्य दुकानांमधून वितरित केला जाणारा मका निकृष्ट दर्जाचा असल्याची तक्रार अनेक लाभार्थ्यांकडून केली जात आहे. हा मका खाण्यायोग्य नसल्याचे नागरिकांचे म्हणणे असून त्यामुळे अनेक लाभार्थी तो वापरण्यास टाळाटाळ करत आहेत. शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा उद्देश गरीब व गरजू नागरिकांना दर्जेदार अन्नधान्य उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना प्रत्यक्ष उपयोगी पडेल असे धान्य उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
जिवती तालुक्यातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांना दर्जेदार गहू उपलब्ध झाल्यास त्याचा मोठा लाभ होईल. त्यामुळे संबंधित पुरवठा विभागाने तसेच प्रशासनाने या तक्रारींची वस्तुनिष्ठ पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
तहसीलदार, जिवती यांनी स्थानिक परिस्थिती, नागरिकांच्या अडचणी आणि लाभार्थ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून स्वस्त धान्य दुकानांमधील मका वाटप बंद करून त्याऐवजी गव्हाचे वाटप सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उद्धव गोतावळे यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून केली आहे.
___________________________________________________
शेणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तात्काळ भरा; पावसाळ्यात आरोग्य यंत्रणा सक्षम करा – सय्यद शब्बीर जागीरदार
जिवती तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागात आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, शेणगाव येथील सर्व रिक्त पदे तात्काळ भरून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी सय्यद शब्बीर जागीरदार, विदर्भ अध्यक्ष, पत्रकार संरक्षण संघ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र, शेणगाव येथे वैद्यकीय अधिकारी – १, औषध निर्माण अधिकारी – १, परिचर – २, आरोग्य सेवक – २, सुमन योजना अंतर्गत अधिपरिचारिका – २ अशी महत्त्वाची पदे रिक्त आहेत. तसेच उपकेंद्र कुंभेझरी व टेकामांडवा येथे प्रत्येकी एक अशा दोन आरोग्य सेविकांची पदेही रिक्त असल्याने ग्रामीण व आदिवासी नागरिकांना वेळेवर आरोग्य सेवा मिळण्यात गंभीर अडचणी निर्माण होत आहेत.
सध्या पावसाळ्यामुळे ताप, मलेरिया, डेंग्यू, सर्पदंश तसेच विषारी जीव-जंतूंच्या दंशाच्या घटना वाढण्याची शक्यता आहे. अलीकडेच विषारी जीवाच्या दंशामुळे अंदाजे पाच ते सहा जणचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क व सज्ज असणे आवश्यक आहे. मात्र कर्मचारी अपुरे असल्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर प्रचंड कामाचा ताण येत असून रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यात अडचणी निर्माण होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
अतिदुर्गम आदिवासी भागातील नागरिकांना संविधानाने दिलेला आरोग्य सेवेचा अधिकार प्रभावीपणे मिळणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे रिक्त पदे दीर्घकाळ रिक्त ठेवणे ही बाब गंभीर असून जिल्हा आरोग्य प्रशासनाने याची तातडीने दखल घेणे आवश्यक असल्याचे सय्यद शब्बीर जागीरदार यांनी म्हटले आहे.
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये जीवनावश्यक औषधांचा पुरेसा साठा, सर्पदंशावरील आवश्यक औषधे, लसीकरण साहित्य व आपत्कालीन उपचारासाठी लागणारी साधने उपलब्ध ठेवण्याची मागणीही करण्यात आली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी या गंभीर परिस्थितीची तातडीने पाहणी करून सर्व रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर राबवावी, आरोग्य यंत्रणा सक्षम करावी आणि जिवती तालुक्यातील आदिवासी नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा जनआंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही सय्यद शब्बीर जागीरदार यांनी दिला आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत