Breaking News

शासकीय नकाशावरील रस्ते खुले करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

 शासकीय नकाशावरील रस्ते खुले करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्ह्यातील शासकीय पाणंद व गाव नकाशावर नोंद असलेले रस्ते कोणत्याही व्यक्तीच्या तक्रारीची प्रतीक्षा न करता प्रशासनाने स्वतःहून खुले करावेत, तसेच शासकीय रस्त्यांवरील अतिक्रमणांबाबत शासनाच्या परिपत्रकानुसार संबंधित अतिक्रमणधारकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शेत पाणंद रस्ते कृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

कृती समितीचे राज्य अध्यक्ष कृष्णात जाधव यांनी या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी असलेले पाणंद व शासकीय रस्ते अतिक्रमणामुळे बंद होत असल्याने शेतीच्या कामांसह शेतमालाची वाहतूक आणि दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

या आंदोलनाला पाठिंबा देताना नॅशनल सोशालिस्ट पार्टीचे प्रवक्ते पियूष पाटील यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. “आम्ही येथे तमाशा करण्यासाठी किंवा कोणाच्या दारी भीक मागण्यासाठी आलो नाही; आमच्या हक्कासाठी आलो आहोत. हा लढा कोणत्याही एका व्यक्तीविरोधात नसून प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आहे. शासन आणि प्रशासनाचे हितचिंतक या नात्याने आम्ही ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून देत आहोत,” असे पाटील यांनी सांगितले.

प्रशासनाने स्वतःहून रस्ते खुले करण्याची मागणी

गाव नकाशावर तसेच शासकीय अभिलेखांमध्ये नोंद असलेले रस्ते प्रत्यक्षात अतिक्रमणमुक्त करून शेतकऱ्यांसाठी खुले करावेत. त्यासाठी प्रत्येक प्रकरणात स्वतंत्र तक्रारीची प्रतीक्षा करण्याऐवजी प्रशासनाने उपलब्ध शासकीय नोंदींच्या आधारे कार्यवाही करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

तसेच शासकीय रस्त्यांवरील अतिक्रमणधारकांविरुद्ध शासनाच्या संबंधित परिपत्रकानुसार कठोर कारवाई करावी आणि पात्र प्रकरणांमध्ये संबंधित शासकीय नोंदी व सुविधांबाबत नियमानुसार कार्यवाही करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

या आंदोलनाच्या वेळी चंद्रशेखर मस्के, माहिती अधिकार कार्यकर्ते भिकाजी कांबळे, उत्तम जाधव (करवीर), जयजयराम माने (करवीर), विष्णू माने (गगनबावडा), बाळू पाटील (खातेदार, करवीर), उत्तम पाटील (करवीर), सुकुमार चव्हाण (हातकणंगले), सर्जेराव गायकवाड, बाळासाहेब कुऱ्हाडे (राधानगरी), क. वाळवे, कृष्णात धोंडीराम पाटील (करवीर), बाजीराव पाटील (हिरवडे), मारुती खाडे (सांगरूळ), अमर पाटील (कावणे), मधुकर पाटील (कागल), जमीनदार सुनील कारंडे, शिवाजी कदम, चंद्रकांत शेळके, अब्दुल्लाट यांच्यासह अन्य आंदोलक उपस्थित होते.

दरम्यान, आंदोलकांच्या मागण्यांबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते आणि शासकीय नकाशावरील रस्ते खुले करण्यासाठी कोणती कार्यवाही केली जाते, याकडे शेतकरी आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत