Breaking News

दारूच्या नशेत मित्रानेच केली मित्राची हत्या

दिघोरी दहन घाटाच्या मागील परिसरात घडली घटना

(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) नागपूर : दारूच्या नशेत वाद झाल्यानंतर एका तरुणाचे मित्रच वैरी बनले. त्यांनी चाकूचे घाव घालून रोशन पुरी (२०) नामक तरुणाची हत्या केली. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल रात्री ८ ते ८.३० च्या सुमारास ही घटना घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशन आणि त्याचा अनमोल नामक मित्र दिघोरी घाटाजवळ आले असताना त्यांच्यात वाद निर्माण झाला.

अनमोल आणि साथीदारांनी चाकूचे घाव घालून रोशनला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. ही माहिती कळताच वाठोडाच्या ठाणेदार आशालता खापरे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी रोशनला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

दरम्यान, रोशनची हत्या त्याच्या अनमोल नामक मित्रासह अन्य दोघांनी केल्याचे कळताच पोलिसांनी आरोपींची शोधाशोध सुरू केली. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांना आरोपी मिळाले नव्हते. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत