Breaking News

भाच्याकडे निघालेल्या मामाच्या कारचा भीषण अपघात : दोन ठार, तीन जखमी

भाच्याकडे निघालेल्या मामाच्या कारचा भीषण अपघात : दोन ठार, तीन जखमी

(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) अहमदनगर : पुण्यातील भाच्याच्या घरी सत्यनारायणाची पूजा असल्याने जळगावहून पुण्याला निघालेल्या मामाच्या कारला नेवासा फाटा येथे भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून तिघे जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. पुढे जाणाऱ्या कंटेनरला कारची जोरदार धडक बसली. रविवारी पहाटे हा अपघात झाला.

हेही वाचा :- कोलेज विद्यापीठ भरतीत आता एसी ओबीसी आदिवासी यांना नव्या कायदयाअंतर्गत न्याय मिळणार

रावेरमधून कोलते व सांगेले कुटुंबीय पुण्याला निघाले होते. औरंगाबाद-पुणे महामार्गावरून जात असताना रविवारी पहाटे नेवासा फाटा येथे त्यांच्या कारला अपघात झाला. नेवासा फाटा येथील चौकात नव्याने गतिरोधक बसवण्यात आला आहे. त्याचा अंदाज न आल्याने जवळ आल्यावर वाहने अचानक थांबवली जातात. अशाच पद्धतीने अचानक थांबलेल्या कंटेनरवर पाठीमागून भरधाव वेगाने येणारी कार धडकली. यामध्ये कारचा पुढील भाग चेपला गेला.

अपघातात कारमधील गजेंद्र रुपचंद कोलते (वय ६५ रा. वाघोदे, ता.रावेर जिल्हा जळगाव) व आकाश प्रकाश सांगेले (वय २८ रा. थोरगव्हाण, ता.रावेर, जि.जळगाव) हे जागीच ठार झाले. तर कल्पेश विनोदचंद पाटील (वय ३५), भूमिका कल्पेश पाटील (वय ६, रा वलसाड, गुजरात) व सुलभा गजेंद्र कोलते (वय ५५) हे तिघे जखमी झाले आहेत. जखमींवर नेवासा फाटा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा :- ओबीसींवर होणारा अन्याय दूर न झाल्यास मंत्रिपदाचा त्याग करणार - विजय वडेट्टीवार

दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नेवासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. अपघाताला निमंत्रण ठरणाऱ्या गतिरोधकाजवळ पांढरे पट्टे मारावेत, सूचना फलक लावावेत, अशा सूचना पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. तसंच कंटेनरचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत