विद्यार्थ्यांनी भरलेल्या एसटी बसवर दगडफेक, घटनेने एकच खळबळ
विद्यार्थ्यांनी भरलेल्या एसटी बसवर दगडफेक, घटनेने एकच खळबळ
(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात एसटी बसवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या बसमधून 30 विद्यार्थी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसवर दगडफेक झाल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अज्ञातांनी ही दगडफेक केली आहे. या दगडफेकीच्या घटनेत चालक कुमार तांबट यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सिंधुदुर्गातील कणकवली येथून कळसुलीकडे निघालेल्या एसटी बसवर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. सकाळी 8 वाजून 15 मिनिटांच्या आसपास ही घटना घडली आहे. या एसटी बसमधून 30 विद्यार्थी प्रवास करत होते. या दगडफेकीच्या घटनेत कुठल्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाहीये. मात्र बस चालकाच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपानंतर राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ केली. मात्र, एसटी कर्मचारी राज्य शासनात विलिनीकरण कऱण्याच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे अद्यापही अनेक कर्मचारी संपावरच आहेतय तर काही कर्मचारी सेवेत रुजू झाले आहेत. एसटी सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला असतानाच अनेक ठिकाणी एसटी बसवर दगडफेक होण्याच्या घटना समोर येत आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आतापर्यंत एसटीचे 550 कोटींचे नुकसान झाले आहे. 10 हजार कर्मचाऱ्यांचे आतापर्यंत निलंबन झालं आहे. सरसकट कामगारांची चुकी नाही. भडकवणारे उद्या निघून जातील, पण कर्मचारी पगाराविना राहतील अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.
कर्मचाऱ्यांच्या लक्षात येवू लागलंय की विलिनीकरणाचा मुद्दा कोर्टात आहे. कर्मचाऱ्यांचे विविध गट भेटतायत. प्रत्येक आत्महत्तेला एसटी संपासोबत जोडलं जातंय. कर्मचाऱ्यांना कामावर यायचं आहे पण काही जण त्यांना अडवत आहेत असंही अनिल परब म्हणाले होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत