नागपूर जिल्ह्यातील शाळा आजपासून सुरू
नागपूर जिल्ह्यातील शाळा आजपासून सुरू
(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) नागपूर : गेल्या महिन्याभरापासून बंद असलेल्या पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा उद्या मंगळवारपासून सुरू करण्याचा निर्णय जिल्हा आणि महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. वर्ग सुरू करताना कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
राज्य सरकारने दिलेल्या निर्णयानुसार १५ जुलैला ग्रामीण भागातील ८ वी ते १२ वीचे वर्ग असलेल्या शाळा सुरू करण्यात आल्यात. २० ऑक्टोंबरपासून ग्रामीण भागातील ५ वी ते ८ वी व शहरी भागातील ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरू झाल्या. १ डिसेंबरपासून राज्यातील पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यानुसार ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या. परंतु, शहरी भागातील शाळांचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोडला.
मेस्टाच्या आंदोलनाला यश
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याला सर्वच स्तरातून याला विरोध करण्यात आला. महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टीज असोसिएशनद्वारे सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आले होते. त्यातून शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मंगळवारपासून नागपूर जिल्ह्यात शाळा सुरू करण्यात येणार असल्याने मेस्टाच्या आंदोलनाला यश आल्याची प्रतिक्रिया जिल्हा कार्याध्यक्ष निशांत नारनवरे यांनी दिली आहे.
महाविद्यालयावर निर्णय लवकरच
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे महाविद्यालय सुरू करण्याचे आदेश काढण्यात आले. मात्र, याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार त्या-त्या जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाकडे देण्यात आली आहे. त्यामुळे महाविद्यालय सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे.
''शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला असून नियमांचे पालन करून त्या सुरू होणार आहेत. महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यापीठाने सूचना दिल्या आहेत. ती सुरू करण्यासाठी महाविद्यालयांनी परवानगी मागावी, त्यांच्या अर्जावर विचार करून सुरू करण्यासंदर्भात निर्णय दिला जाईल.''


कोणत्याही टिप्पण्या नाहीत