सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु
गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु
(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) गोंदिया : एका सामाजिक कार्यकर्त्यावर अज्ञात आरोपीने गोळीबार केल्याची घटना गोंदिया शहरात आज घडली आहे. या हल्ल्यात सामाजिक कार्यकर्ता जखमी झाले असून त्यांच्यावर गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. धनेंद्र भुरले असे हल्ला करण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे. गोळीबारात भुरले यांच्या चेहऱ्यावर गंभीर इजा झाली आहे. मात्र सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. गोंदियातील जेष्ठ समाजसेविका सविता बेदरकर भुरले यांचे धनेंद्र भुरले हे पती आहेत. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. हा कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला याबाबत अद्याप माहिती कळू शकली नाही. याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहेत.
शेतावरुन घरी येत असताना भुरलेंवर हल्ला
गोंदिया शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या भुरले यांच्या शेतावर अनाथालयाचे बांधकाम सुरु आहे. धनेंद्र भुरले हे बांधकामाच्या ठिकाणी होते. भुरले यांना शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ते कुठे आहेत अशी विचारणा केली. यावर भुरले यांनी मी शेतावरून घरी परत येत आहे अशी माहिती फोन वरून दिली. यानंतर गोंदिया शहराला लागून असलेल्या कटंगी गावाजवळ अज्ञात आरोपीने त्यांना एका दुचाकी वाहनावरून येत रस्त्यात अडवत त्यांच्यावर गोळीबार केला. हा गोळीबार छऱ्या वाल्या बंदुकीने केल्याने भुरले यांच्या चेहऱ्यावर गंभीर इजा झाली. त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत