Breaking News

सरकारमान्य देशी दारू दुकानात देशी दारू ज्यादा दराने विक्री राज्य उत्पादन शुल्क विभाग अनभिज्ञ - सय्यद शब्बीर जागीरदार

 सरकारमान्य देशी दारू दुकानात देशी दारू ज्यादा दराने विक्री राज्य उत्पादन शुल्क विभाग अनभिज्ञ - सय्यद शब्बीर जागीरदार 

(महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी) शेख हक्कानी, जिवती  : - राज्य सरकारने विदेशी दारूचे कर ५० टक्क्यांनी कमी करून एकीकडे श्रीमंतांना दिलासा दिला असतानाच, जिवती शहरात देशी दारूच्या मूळ किमतीपेक्षा अधिक दराने विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या संबधित प्रकारापासून राज्य उत्पादन शुल्क विभाग अनभिज्ञ असल्याने सामान्यांची लूट, तर श्रीमंतांना दिलासा का, असा प्रश्‍न तळीरामांकडून विचारला जात आहे. या अधिकच्या किंमतीने

तळीरामांच्या खिशाला कात्री बसत आहे, कोरोनाकाळात मद्याची दुप्पट, तिप्पट नव्हे तर चौपट दराने विक्री शहरात व तालुक्यात- जिल्ह्यात झाली. त्यातून कोणाला किती ‘अर्थ’ लाभ झाला, हा विषय संशोधनाचा आहे.  मात्र, गेल्या काही दिवसांपासून जिवती शहरातील वाइन शॉप व सरकारमान्य देशी दारूच्या दुकानातून मूळ किमतीपेक्षा ५ ते १० रुपये जास्त आकारले जात आहेत. त्यामुळे तळीरामांच्या खिशाला कात्री बसत आहे. 

दरम्यान, मागच्याच आठवड्यात राज्य शासनाने परदेशातून आयात होणाऱ्या विदेशी दारूचा  कर ५० टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा करून उच्चभ्रू वर्गातील तळीरामांना दिलासा दिला. दुसरीकडे मात्र गरीब वर्गातील मद्यपींना देशी दारू मूळ किंमत ६० रुपयांऐवजी ७० रुपये दराने विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाढीव दराबाबत कुठलीही घोषणा केलेली नाही, तरी जिवती शहरातील देवालागुडा रोड वरील  सरकारमान्य देशी दारू दुकानात ७० रुपयांना देशी दारूची विक्री केली जात आहे.  तरी राज्य उत्पादन शुल्क विभाग या प्रश्नी अनभिज्ञ असल्याने कमालीचे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

भरारी पथके नावालाच आहेत की काय? जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यांसाठी भरारी पथकांची नेमणूक केलेली असते. बनावट दारू विक्रीबरोबरच परराज्यातून विनापरवाना दारू वाहतुकीवर पथकाकडून बारकाईने लक्ष ठेवले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जिवती शहरातील देवलागुडा रोडवर देशी दारू दुकानात मूळ किमतीपेक्षा ५ ते १० रुपये जास्त दर आकारले जात असताना याकडे भरारी पथकांचे दुर्लक्ष कसे, हा प्रश्‍न विचारला जात आहे. 

  दर परवडत नसल्याने देशी दारूची विक्री कमी होत आहे. याबाबत तळीरामांना विचारणा केली असता, देशी दारूला  ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.ठरविलेल्या किमतीपेक्षा अधिकची रक्कम मोजावी लागत असल्यामुळे  आम्हाला ती परवडत नसल्याचे कारण ग्रामीण भागातील तळीरामांकडून सांगण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत