Breaking News

पिकासाठी औषधी आणायला गेला भाऊ, रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

 पिकासाठी औषधी आणायला गेला भाऊ, रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह


(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) मुंबई : नाशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आज मनमाडमध्ये तीष्ण हत्याराने डोक्यावर घाव घालून एका तरुणाचा निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना मनमाड-लासलगाव मार्गावर घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल आहिरे(वय-32,रा.धाबलीपिंपळ ता. चांदवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केल्यानंतर  जनावरांच्या अवैध खरेदी-विक्रीतून अनिलची ही हत्या करण्यात आली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.


मनमाडपासून जवळ लासलगाव मार्गावर एक मृतदेह आढळून आल्याची महिती मिळताच पोलीस उपधीक्षक समीर सिंग साळवे, पोलीस निरीक्षक समीर बावरकर, सहाय्यक निरीक्षक प्रल्हाद गीते, गजानन राठोड, हरिश्चंद्र पाळवी, अशोक पवार, नरेश सौंदाणे, उत्तम गोसावी,मुद्दसर शेख, गणेश नरवटे, संदीप झालटे, खैरनार,रणजित चव्हाण,आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता त्यांना रक्ताच्या थारोळ्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला त्याच्या डोक्यावर, पोटावर हातावर धारदार हत्त्याराने वार करून त्याला ठार मारण्यात आल्याचे निदर्शनास आले जवळच त्याची मोटारसायकल सोबत दारूच्या बाटल्या देखील पडलेल्या होत्या.


पोलिसांनी  तपास सुरू केल्यानंतर मयत तरुणाचे नाव अनिल आहिरे असून तो चांदवड तालुक्यातील धाबलीपिंपळ येथील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्या घरच्या लोकांशी संपर्क केल्यानंतर मयताचा भाऊ आणि वडील घटनास्थळी आले आणि त्यांनी मृतदेह अनिलचाच असल्याचे सांगितलं. रविवारी अनिल पिकावरील औषधे आणण्यासाठी मित्रासोबत जात असल्याचे सांगून गेला होता, मात्र रात्री तो परत आला नाही अशी माहिती त्याच्या भावाने पोलिसांनी दिली. अनिल हा जनावर खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होता, असेही त्याने पोलिसांना सांगितलं. कदाचित जनावरांच्या अवैध खरेदी-विक्रीतून वाद होऊन अनिलची हत्या करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आणखी बातम्या वाचण्या करिता इथे क्लिक करा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत