Breaking News

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तरुणाचा कांड उघड, पोलिसांमुळे नवरदेवाचं 'हनिमून' लॉकअपमध्ये

 लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तरुणाचा कांड उघड, पोलिसांमुळे नवरदेवाचं 'हनिमून' लॉकअपमध्ये


(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) वर्धा : वर्धा जिल्ह्यातील सिंदी याठिकाणी एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका तरुणाला लग्न झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच तुरुंगाची हवा खावी लागली आहे. एका पीडित तरुणीने गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी नवरदेवाची रिसेप्शनच्या मंडपाबाहेरूनच उचलबांगडी केली आहे. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तरुणाला पोलिसांनी लॉकअपमध्ये टाकल्याने सिंदी गावात एकच खळबळ उडाली आहे. तसेच नातेवाईकांना देखील धक्का बसला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


प्रशांत रमेश खैरे असं गुन्हा दाखल झालेल्या नवरदेवाचं नाव आहे. ऐन रिसेप्शनच्या दिवशी पोलिसांनी त्याची उचलबांगडी केल्यामुळे हनिमूनची रात्र त्याला तुरुंगात घालवावी लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांत यानं काही दिवसांपूर्वी एका तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केला होता. त्याने पीडितेला नागपूर जिल्ह्यातील कवठा गावातील एका ओळखीतील तरुणाच्या शेतात मालवाहू वाहनातून घेऊन जात, तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला होता. हा धक्कादायक प्रकार 27 मे 2021 ते जून महिन्यांपर्यंत सुरू होता.


दरम्यान पीडित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीनं पीडितेला लग्नाचं आमिष दाखवून तिचा गर्भपात घडवला होता. या प्रकारानंतर पीडित तरुणीनं आरोपी प्रशांतकडे लग्नाची गळ घातली, पण त्याने लग्नास नकार दिला. तसेच पीडित तरुणीच्या परस्पर त्याने एका वेगळ्याच मुलीसोबत विवाह केला. या घटनेची माहिती मिळताच पीडित तरुणीनं पोलीस ठाण्यात धाव घेत, प्रशांतविरोधात सिंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आरोपी तरुणाची उचलबांगडी केली आहे.


आरोपी प्रशांतचा विवाह 5 फेब्रुवारीला संपन्न झाला होता. दुसऱ्या दिवशी 6 फेब्रुवारी रोजी गावात रिसेप्शनचा कार्यक्रम होणार होता. दरम्यान सिंदी पोलिसांनी रिसेप्शन मंडपाबाहेरूनच सापळा रचून नवरदेवाला ताब्यात घेतलं आहे. ऐन रिसेप्शनच्या दिवशी पोलिसांनी नवरदेवाला अटक केल्यानं गावात खळबल उडाली आहे. या घटनेचा सविस्तर तपास सिंदी पोलीस करत आहेत. आणखी बातम्या वाचण्या करिता इथे क्लिक करा 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत