Breaking News

सावित्री सारखी स्वयंशिस्त वाहतूक नियमांसाठी प्रत्येक नागरिकांनी लावणे आवश्यक - जिल्हाधिकारी

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सावित्री पथकाचा शुभारंभ


महा घडामोडी न्यूज नेटवर्क नागपूर : इतिहासातल्या प्रत्येक सावित्रीने स्वयंशिस्तीने कठीण ठरलेले काम सोपे करून दाखविले आहे. महिला म्हटलं की प्रत्येक गोष्ट करून दाखविण्याची जिद्द आणि क्षमता उपजतच तिला मिळाली आहे. नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्था घराघरातील सावित्रीकडून अशा स्वयंशिस्तीची अपेक्षा करते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आज येथे केले.

नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत वाहतूक नियमांना जना जनात मना मनात करण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सावित्री पथकाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या पथकामार्फत महिलांना वाहतूक नियमांबाबत जागृती करून अपघात कमी करण्यासाठी जागृत करण्यात येणार आहे. आणि हे कार्यदेखील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या महिलांनी आपल्याकडे घेतले आहे. यासाठी महिलांना विशेष प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे. प्रत्येक कुटुंबात वाहन चालविणे, या विषयावर चर्चा घडविणे हा अंतिम उद्देश या पथकाचा आहे. नागपूरची वाहतूक व्यवस्था उत्तम आहे. रस्ते देखील उत्तम आहे. मात्र वाहतुकीची शिस्त,आणखी सुधारण्यास वाव आहे. त्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी घेतलेला हा पुढाकार आहे.


        या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आर.विमला यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या सरकारी अभियोक्ता केतकी जोशी, महामार्गाच्या पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर (निनावे), माजी महापौर नंदा जिचकार, प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेंढे आदी व्यासपीठावर उपस्थित होत्या.

      नागपुरातील वाहतूक व्यवस्थेला अधिक शिस्त लावणे गरजेचे असल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले नागरिकांना स्वयं शिस्त लावण्यासाठी परिवहन विभाग पुढाकार घेत असल्याचा आनंद आहे आज महिला दिनी यासाठी विशेष पथक गठित करून कार्यान्वित केल्याबद्दल त्यांनी या विभागाचे कौतुक केले यावेळी बोलताना सरकारी अभियोक्ता केतकी जोशी यांनी ज्या ठिकाणी महिलांना संधी मिळते त्या ठिकाणी आपली छाप छोडणे आवश्यक असल्याचे सांगितले. महिला म्हणजे व्यापकता, महिला म्हणजे शिस्तबद्धता, महिला म्हणजे नियोजन, त्यामुळे महिलांच्या हाती येणारा कारभार चोख, नीट आणि बिनचूक राहील याची काळजी आपण घेतली पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले यावेळी पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर यांनी वाहतूक नियमां बद्दल प्रत्येक स्त्रीने जागरूक होणे आवश्यक आहे पोलिसांच्या भेटीसाठी नाहीतर स्वतःसाठी वाहतूक नियम पाळले गेले पाहिजे, त्याची शिस्त आपल्या घरातील मुलांना पतीला आणि सगळ्यांनाच लावण्याचं दायित्व महिला उत्तम पणे पार पाडू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. मेजर शिल्पा खरपकर,स्नेहा मेंढे यांनीही यावेळी समयोचित भाषणे केली. कार्यक्रमाचे संचालन कांचन देशपांडे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत