विद्यार्थिनीचा कुटुंबीयांसमोरच विहिरीत पडून मृत्यू
विद्यार्थिनीचा कुटुंबीयांसमोरच विहिरीत पडून मृत्यू
महा घडामोडी न्युज नेटवर्क, नागपूर : आई-वडिलांसोबत शेतात काम केल्यानंतर विद्यार्थिनी न्याहारी करायला बसली. ती पिण्यासाठी विहिरीतून पाणी काढत असताना बादली काठाला अडकली आणि तिला तोल गेल्याने तो विहिरीत पडली, त्यातच तिचा बुडून मृत्यू झाला.
ही घटना नरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरखेड- सावरगाव मार्गावरील पिंपळगाव (बखाजी) शिवारात गुरुवारी (दि. २८) सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. मीनल राजेंद्र तिजारे (२७, रा. पिंपळगाव) वखाजी, ता. नरखेड) असे दुदैवी विद्यार्थिनीचे नाव आहे. ती नरखेड येथील पंढरीनाथ महाविद्यालयात इयत्ता ११ वी विज्ञान शाखेत शिकायची. तिची पिंपळगाव (बखाजी) शिवारात शेती असल्याने ती आई, वडील व भावासोबत सकाळी ६ वाजताच्या सुमारास शेतात कामाला गेली होती. सकाळी ८ वाजताच्या सुमारास सर्व जण न्याहारी करायला बसले होते. प्यायला पाणी हवे असल्याने मीनल शेतातील विहिरीतून दोर व बादलीने पाणी काढायला गेली.
विहिरीतून पाणी काढत असताना बादली काठाला अडकली ती बादली झटक्याने ओढण्याच्या प्रयत्नात तिचा तोल गेला व ती विहिरीत पडली. आई, वडील व भावाला तिला विहिरीतून बाहेर काढणे शक्य न झाल्याने त्यांनी आरडाओरड करून शेजाऱ्यांना बोलावले. विहिरीत पाणी बरेच असल्याने तोपर्यंत तिचा बुडून मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले व मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी नरखेड येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. याप्रकरणी नरखेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत