Breaking News

मानवी वस्तीवर बिबटय़ांचे वाढले हल्ले, १५ दिवसांत बिबटय़ाचा दुसरा हल्ला


बिबटय़ाच्या हल्ल्यात दुसऱ्यांदा बालिकेचा बळी, बिबटय़ाच्या हल्ल्यात सहा वर्षीय गायत्रीचा जागीच मृत्यू


महा घडामोडी न्यूज नेटवर्क नाशिक : काही महिन्यांपासून बिबटय़ांचा मुक्त वावर जिल्ह्यात सुरू असून मानवी वस्तीवर बिबटय़ांचे हल्ले वाढले आहेत. बुधवारी रात्री गिरणारेजवळ बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यात साडेसहा वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला. या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली असून वनविभागाकडून पिंजरा लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.


गायत्री लिलके (रा. कोचरगाव) ही गिरणारे येथील बालिका धोंडेगाव येथे मामाच्या गावाला सुट्टीनिमित्त राहण्यासाठी आली होती. बुधवारी रात्री घराबाहेर खेळत असताना बिबटय़ा अचानक आला. त्याने गायत्रीच्या दिशेने झडप घेतली. या वेळी आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरड केल्याने बिबटय़ाने गायत्रीला जबडय़ातून सोडून धूम ठोकली.  झाला.


 या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मागील १५ दिवसांतील बिबटय़ाचा हा दुसरा हल्ला असून बिबटय़ाच्या हल्ल्यात दुसऱ्यांदा बालिकेचा बळी गेला आहे. या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाकडून पिंजरा लावण्यात येत असला तरी नागरिकांनी खबरदारी म्हणून अंधारात बाहेर पडू नये, बाहेर जाताना सोबतीला कोणाला तरी घ्यावे, आवाज आणि प्रकाशाला बिबटय़ा घाबरत असल्याने तशी काळजी घ्यावी, अशी सूचना वनविभागाच्या वतीने करण्यात आली आहे.


ऊसतोडीमुळे बिबटय़ांचा वावर वाढला

 जिल्हा परिसरात ऊसतोडीचे काम वाढले आहे. ऊसतोड होत असल्याने शेत मोकळे होत आहे. बिबटय़ांना लपण्यास जागा नसल्याने ते बाहेर पडत आहेत.  लोकांकडून सातत्याने सुरक्षा व्यवस्था म्हणून पिंजऱ्याची मागणी केली जाते, मात्र पिंजरा हा पर्याय नाही. पिंजऱ्यामुळे गुंतागूंत वाढत जाते. बिबटय़ाचा वावर हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात असतो. असा एखादा बिबटय़ा पिंजऱ्यात अडकला की त्याला दुसरीकडे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येते. त्या वेळी तो अस्थिर झाल्याने मिळेल त्याची शिकार करतो. पिंजऱ्यात जर मादी बिबटय़ा जेरबंद झाली तर तिच्या बछडय़ांचा प्रश्न निर्माण होतो. यामुळे नागरिकांनी पिंजऱ्याची मागणी करण्यापेक्षा खबरदारी बाळगावी.


 विवेक भदाणे 
(वनपरिक्षेत्र अधिकारी)

वनविभागाकडे पिंजऱ्यांची संख्या कमी वनविभागाकडे सध्या १५ ते २० पिंजरे आहेत. त्यातील काही राखीव ठेवण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत त्यातील काही पिंजरे हे आदिवासीबहुल परिसरात लावण्यात आले आहेत. उर्वरित पिंजरे वनविभागाकडे आहेत.


 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत