बेला पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेडेश्वर येथून आठ आरोपींना गुन्हे शाखेने घेतले ताब्यात
चोरांची टोळी सामानासह झाली गजाआड
स्थानिक गुन्हे शाखेची महत्त्वपूर्ण कामगिरी
महा घडामोडी न्यूज नेटवर्क,नागपूर : बेला ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अचानक वाढलेले हे चोऱ्यांचे प्रमाण पाहता स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यांनी टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी योजना आखली. त्यानुसार हवालदार महेश जाधव यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी करीत या टोळीची माहिती काढली. त्याच आधारावर ८ कुख्यात गुन्हेगारांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बेला पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेडेश्वर येथून आठ आरोपींना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता चौकशीअंती त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. प्रदीप अंबादास धुमाळ, मनोज मोहन पवार, गोविंदा मनोहर जाधव, विजय विठोबा धुमाळ, अविनाश सुरेश महापुरे, रवींद्र दिलीप महापुरे, गणेश सूर्यभान मंडस्कर, शंकर देवभान नैताम अशी आरोपींची नावे आहेत.
या आरोपींकडून ५६ नग लोखंडी प्लेट किंमत १३४४००, लोखंडी व्हॉल्व १८०० रुपये, दोन चार चाकी वाहने किंमत तीन लाख रुपये, एक दुचाकी किंमत चाळीस हजार रुपये ६ नग जुने वापरलेले मोबाईल असा एकूण ४ लाख ९८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. मिळालेला मुद्देमाल व आठ आरोपींची वैद्यकीय तपासणी करून बेला पोलीस स्टेशनच्या ताब्यात त्यांना देण्यात आले. सदरची महत्त्वपूर्ण कामगिरी पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र वैरागडे, पोलिस हवालदार महेश जाधव, मदन आसतकर, मयुर ढेकळे, अमृत किनगे, चालक भाऊराव खंडाते यांनी पार पाडली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत