Breaking News

गुप्तधनासाठी पत्नीचा बळी देण्याचा प्रयत्न, पतीसह सहा जणांवर गुन्हे दाखल

 गुप्तधनासाठी पत्नीचा बळी देण्याचा प्रयत्न, पतीसह सहा जणांवर गुन्हे दाखल

महा घडामोडी न्यूज नेटवर्क, यवतमाळ : गुप्तधनासाठी पत्नीचा छळ करून नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना सोमवारी समोर आली. या प्रकरणात पांढरकवडा पोलिसांत दाखल तक्रारीवरून पतीसह सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. घाटंजी तालुक्यात मागील महिन्यात गुप्तधनासाठी स्वतःच्या मुलीचा नरबळी देण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला होता. लागोपाठच्या या घटनांनी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

आर्णी तालुक्यातील भंडारी येथील या महिलेचा विवाह काही वर्षांपूर्वी केळापूर येथील प्रवीण गोविंदराव शेगर याच्यासोबत झाला. काही वर्षे त्यांचा संसार आनंदात सुरू होता. नंतर माहेरून दोन लाख रुपये घेऊन येण्यासाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. याच सुमारास प्रवीणला काही लोकांनी गुप्तधनासाठी भडकवले. 

त्याने हे धन मिळविण्यासाठी पत्नीची पूजा केली. अंगारा लावल्यानंतर हार टाकून बळी देण्याचा प्रयत्न सुरू केला. पतीचा उद्देश लक्षात येताच पत्नीने घरातून जीवाच्या आकांताने पळ काढला. थेट माहेर गाठून पांढरकवडा पोलिस ठाण्यात पती, सासरा, सासू, नणंद व पतीविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतील सगळेच फरार असल्याने पोलिसांकडून शोध सुरू असल्याचे ठाणेदार जगदीश मंडलवार यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत