गंगाजमुना वस्तीचे वास्तव ! चोवीस तास शंभरावर पोलीस, तरी देहव्यापार!
गंगाजमुना वस्तीचे वास्तव ! चोवीस तास शंभरावर पोलीस, तरी देहव्यापार!
महा घडामोडी न्यूज नेटवर्क,नागपूर : गंगाजमुनामध्ये पोलीस आयुक्तांनी जवळपास ४०० पोलिसांचा ताफा नेऊन अवैध देहव्यापार बंद करण्यासाठी मोठी कारवाई केली होती. आताही शंभरावर पोलीस गंगाजमुनात तैनात आहेत. परंतु, आजच्या स्थितीत जणूपोलीस संरक्षणातच देहव्यापार सुरू असल्याचे चित्र आहे.
गेल्यावर्षी नागपूर पोलिसांनी गंगाजमुना वस्तीत अचानक छापेमारी केली होती. यावेळी देहव्यापार करणाऱ्या अनेक महिलांची धरपकड करण्यात आली होती. काहींना अटकही केली होती. तसेच गंगाजमुनातील देहव्यापार पूर्णपणे बंद करण्यात आला होता. वर्षभरापासून गंगाजमुनातील अवैध देहव्यापार रोकण्यासाठी गंगाजमुना वस्तीत चोवीस तास शंभरावर पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. गंजाजमुनातील प्रत्येक गल्लीत महिला पोलीस आणि मुख्य रस्त्यावर पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा असतो. परंतु, सध्या गंगाजमुनातील चित्र पालटले आहे. पोलिसांचा बंदोबस्त असला तरी देहव्यापार जोरात सुरू आहे. अन्य राज्यातील वारांगणांची संख्या वाढत आहे. पूर्वी पोलिसांना घाबरून पळून जाणारे आंबटशौकीन विनासंकोच गंगाजमुनात ये-जा करीत आहेत.
न्यायालयाच्या निर्वाळयानंतर पोलीस मवाळ
सर्वोच्च न्यायालयातील त्रिसदस्यीय खंडपीठानेसुद्धा देहव्यापार हा अन्य व्यवसायाप्रमाणे व्यवसाय असून स्वमर्जीने देहविक्री करणाऱ्या महिलांना पोलीस अटक करू शकत नाही, असे म्हटले होते. देहविक्री करणारी महिला सज्ञान असेल आणि तिच्या इच्छेने शरीरसंबंध ठेवत असेल तर पोलिसांना तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हा निर्णय झाल्यानंतर गंगाजमुनात पोलिसांनी एकही कारवाई केली नाही. मग शंभरावर पोलिसांचा बंदोबस्त कशासाठी, असा प्रश्न विचारला जात आहे.
गंजाजमुना परिसरात पूर्वीपासूनच बाहेरगावावरून लोक येतात. तसेच काही गुन्हेगारी वृत्तीचे अनेक जण गंगाजमुनात येत असतात. ते त्रास देतात, तशा महिलांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे पोलिसांचा मोठा ताफा गंगाजमुनात तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त गोरख भामरे यांनी दिली



कोणत्याही टिप्पण्या नाहीत