गुरुनानक विद्यालय विरुर स्टेशन येथे माजी विद्यार्थ्यांचे स्नेह मिलन सोहळा उत्साहात संपन्न
गुरुनानक विद्यालय विरुर स्टेशन येथे माजी विद्यार्थ्यांचे स्नेह मिलन सोहळा उत्साहात संपन्न
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, विरुर स्टेशन : गुरुनानक विद्यालय विरुर स्टेशनच्या १९९४-९५ बॅचच्या वर्ग १० ‘ब’ मधील माजी विद्यार्थ्यांनी दि. ८ फेब्रुवारी २०२५ रोजी आपल्या माजी शिक्षकांसह शालेय आठवणींना उजाळा देत स्नेह मिलन (गेट-टुगेदर) कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. तब्बल ३० वर्षांनंतर प्रथमच या बॅचच्या विद्यार्थ्यांनी शाळेत पुनर्भेट घेतली. या अनोख्या उपक्रमाची सुरुवात एका महिन्यापूर्वी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मित्रांना संपर्क करून करण्यात आली. १९९४-९५ मध्ये वर्ग १० ‘ब’ मध्ये ५८ विद्यार्थी होते, त्यापैकी ३५ जणांचा शोध लागला आणि त्यामधील २५ विद्यार्थी या गेट-टुगेदर कार्यक्रमात सहभागी झाले.
कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले. शाळेच्या आवारात माजी विद्यार्थ्यांसाठी चायनीज सेंटर व पाणीपुरी स्टॉल लावण्यात आले होते. विशेष म्हणजे, माजी वर्गशिक्षक मा. श्री. बी.के. बोबडे सर यांनी विद्यार्थ्यांना जुन्याच वर्गात उपस्थिती लावण्यास सांगितले. यानंतर त्यांनी मराठी विषयाचा धडा घेऊन त्या काळातील शालेय आठवणी जागवल्या. त्यानंतर गणिताचे माजी शिक्षक श्री. ठाकरे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत या उपक्रमाचे कौतुक केले. यानंतर माजी शिक्षक श्री. पारलेवार सर, श्री. माहुरकर सर, आणि श्री. नगराळे सर यांनीही उपस्थिती लावली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. बी.के. बोबडे सर यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षक आणि सध्या कार्यरत शिक्षक श्री. अमोल बेले सर व श्री. धनराज उराडे सर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. स्वागत गीत माजी विद्यार्थिनी सोनाली उपरे यांनी सादर केले.
कार्यक्रमात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत ३० वर्षांनंतर गुरु-शिष्य भेट होत असल्याचा आनंद व्यक्त केला. मनोगत व्यक्त करताना माजी विद्यार्थिनी सोनाली उपरे आणि मंजुषा अक्केवार यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहिल्या. अनेक विद्यार्थ्यांनी आपली सध्याची वास्तव्य व व्यवसायाबाबत माहिती दिली आणि या अविस्मरणीय क्षणांची आठवण सदैव मनात राहील असे सांगितले. कार्यक्रमाचे कौशल्यपूर्ण संचालन बबन ताकसांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कृष्णा ताकसांडे यांनी केले. कार्यक्रमानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी माजी शिक्षकांसोबत एकत्र भोजनाचा आनंद घेतला.
या स्नेह मिलन सोहळ्यात तिरुपती टोंगे, रवि बोनगिरी, सदाशिव कुबडे, रविंद्र उपरे, सुशील भेंडाळे, दत्तु चापले, मनोहर ठमके, देवराव इग्रपवार, हर्षा रंदीवे, सोनाली उपरे, मंजुषा अक्केवार, संगीता वानखेडे, कृष्णा ताकसांडे, रमेश वडस्कर, तानाजी सोयाम, बबन ताकसांडे, प्रभाकर आत्राम, बंडू खोबरागडे, कार्तिक कमलवार, रमेश मोरे, जमनादास जुंघरे, सुनील काळे, ललितकुमार सोनी आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमामुळे जुन्या शालेय आठवणींना उजाळा मिळाला आणि माजी विद्यार्थ्यांमध्ये नव्याने आपुलकीची भावना निर्माण झाली.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत