जलजीवन मिशनच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार
जलजीवन मिशनच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार
कोट्यवधी रुपयाचा चुराडा तरीही कामे अपूर्ण, संबंधित विभागाचे दुर्लक्ष
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, जिवती : माणिकगड पहाडावरील जिवती तालुका हा दुर्गम असून या तालुक्यात जल जीवन मिशन च्या माध्यमातून तालुक्यात नळ योजनेचे कामे सुरू आहेत. हे कामे शासनाने अंदाजपत्रकानुसार (इस्टिमेट) करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे. परंतु जिवती तालुक्यातील कोणत्याच गावातील नळ योजनेचे कामे हे नियमानुसार व अंदाजपत्रकानुसार कामे झालेली नाही. प्रत्येक गावात नळ योजने करिता पाईपलाईन ही ३ फूट खोल जमिनीमध्ये टाकायचे आहे ती कमी खोदकाम करून पाईपलाईन टाकलेली आहे. ज्या ठिकाणी डांबरीकरण वळण रस्त्याचे खोदकाम केलेले आहे त्या ठिकाणी काँक्रीट करायचे आहे ते केलेले कुठेही दिसत नाही. रायझिंग करणे खोदकाम करणे खडक असेल त्या ठिकाणी ब्लास्टिंग करणे व खोली तीन फिट खोदणे हे सर्व अंदाजपत्रकानुसार करायचे आहे परंतु खोदकाम कमी केलेले असल्याचे बोलले जात आहे. विहिरी पासून ते पाण्याच्या टाकीपर्यंत सिंगल ६ केजी चा अखंड काळा पाईप टाकने अनिवार्य आहे. परंतु काही ठिकाणी २० फूट लांबीचे ४ केजी चे बारीक पाईप टाकले आहेत. या काळ्यापायपाची प्रेशर मशीन ने टेस्टींग करावे लागते तालुक्यातील एकाही कामाची प्रेशर मशीन टेस्टिंग केलेली नाही. नियमानुसार विहिरीचे खोदकाम ५० फुट करणे आणि तसेच काँक्रीट वॉल ५० फूडच्या वर करणे गरजेचे आहे. परंतु तसे न करता
खडकापासून वर १५ ते २० फुट बांधकाम केले असल्याचे दिसून येत आहे. भविष्यात पाणीटंचाई होऊ नये म्हणून विहिरीमध्ये ४ ते ५ आडवे बोर मारणे गरजेचे असून सुद्धा तालुक्यातील एकाही विहिरीत आडवे बोर मारले नसल्याची चर्चा सुरू आहे. पाण्याच्या टाकी पासून जवळच म्हणजे गावाला लागून विहिरीचे खोदकाम करायला पाहिजे होते. परंतु तसे न करता ठेकेदाराच्या फायद्यासाठी याची लांबी वाढवलेली आहे. प्रत्येक घरा समोर सिमेंट काँक्रीटचे प्लॉट फॉर्म तयार करून त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचे नळ लावून देणे असून सुद्धा प्लॅटफॉर्म न बनवता नळ जोडणी केली आहे. विहीर खोदकाम करण्या अगोदर त्या ठिकाणी टेस्टिंग बोरवेल मारून ते पाणी टेस्टिंग साठी पाठवायचे होते. परंतु ते नियमानुसार टेस्टींगला पाठवलेले नाही. पिण्याचे पाण्याचे टाकी बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या बांधकामात माती मिश्रित रेती तसेच हलक्या दर्जाचे सिमेंट लोखंडी राड कमी प्रमाणात वापरण्यात आले आहे. अंदाजपत्रकानुसार जलजीवन मिशन अभिमान अंतर्गत पिण्याच्या पाण्यासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी खर्च झाला असला तरी एकाही गावात नळ योजनेचे कामे पुर्ण झाले नाही. अपूर्णच कामे असल्याने ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे कामे रेंगाळली आहे. त्यामुळे या योजनेने सामान्य माणसाची तहान भागवलीच नाही. हर घर नल हर घर जल घोषणा करून
शासनाने मोठा गाजावाजा करत जलजीवन मिशन या अभियानाची सुरुवात मोठ्या थाटामाटात केली,मात्र कंत्राटदार व संबंधितअधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित राहिले.या योजनेअंतर्गत प्रतिदिन कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पंचावन्न लिटर पाणी मिळणे अपेक्षित आहे मात्र आजघडीला तालुक्यातील एकाही गावात पंचावन्न लिटर तर सोडाच लिटरभरही मिळाले नाही.
जिवती तालुक्यातील गावात, गुड्या, पाड्यात प्रत्येक ठिकाणी जलजीवन मिशन या योजनेच्या माध्यमातून कामे मंजूर व सुरु आहेत, मात्र एकाही गावात हि योजना यशस्वीपणे राबविण्यात आली नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. आतापासूनच माणिकगड पहाडावर पाण्याची टंचाई भासत असल्याचे बोलले जात आहे. कुठे विहीर, पाण्याची टाकी तर कुठे पाईपलाईनचे काम रखडल्याने योजना सपशेल फेल ठरल्याचे विदारक वास्तव पहाडावर पहावयास मिळत आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांकडून टक्केवारी घेऊन थातूरमातूर कामे करून घेतली व बिले अदा करून कमिशनच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाची माया गोळा केली.
उन्हाळ्याची चाहूल लागताच तालुक्यातील अनेक गावातील विहीरींनी तळ गाठला, हातपंपही कोरडे पडले आहेत, घोटभर पाण्यासाठी महिलांना भटकावे लागत आहे.जिल्हा परिषदेत जलजीवन मिशनच्या कामासाठी निधीच नसल्याचा कांगावा करत अधिकारी हात वर करत आहेत, कंत्राटदारांनीही संधीच्या फायदा घेऊन लोकांना वाऱ्यावर सोडले आहे. या कामाकडे पाठ फिरवली असून यंदाही उन्हाळ्यात हि योजना नागरिकांची तहान भागवणार की नाही असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे.
हपापलेल्या कंत्राटदारांनी ऑनलाइन निवीदा प्रक्रियेतून अनेक कामे आपल्या नावे करून घेतली मात्र एकाही कंत्राटदाराने काम पुर्ण केले नसल्याचे आढळून आले आहे. परिणामी जिवती तालुक्यातील नागरिकांचा घसा कोरडा अन् घागर रिकामिच, योजना रखडलेल्या असून तालुक्यातील महिलांना पाण्यासाठी टाहो फोडावा लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील नळ योजनेचे कामे ही नियमानुसार केलेली नसून धातूमातून कामे करून ठेकेदारांनी व संबंधित यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांनी मिळून बिले काढलेली चर्चा सुरू आहे म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित कामाची संबंधित गावचे सरपंच, उपसरपंच तसेच सदस्य गावातील प्रतिष्ठ नागरिक यांच्यासमोर योग्य चौकशी करावी संबंधित ठेकेदाराकडून राहिलेल्या अपूर्ण कामे करून घ्यावी लोकांची तहान भागवावी अशी मागणी तालुक्यातील जनतेने केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत