Breaking News

गरीब ग्राहकांच्या नावाने सिलेंडर डिलिव्हर दाखवून फसवणूक ?

 “मोबाईलवर सिलेंडर ‘डिलिव्हर’, पण घरात चूल थंड !”

गरीब ग्राहकांची फसवणूक? मेताशा इंडियन गॅस एजन्सीवर गंभीर आरोप

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : “मोबाईलवर सिलेंडर पोहोचल्याचा मेसेज येतो, पण प्रत्यक्षात घरात गॅसच नाही... दोन-दोन महिने लाकडे जाळून स्वयंपाक करावा लागतो!” अशा धक्कादायक तक्रारींमुळे कोरपना तालुक्यातील मेताशा इंडियन गॅस एजन्सीचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गरीब आणि अशिक्षित ग्राहकांच्या नावाने सिलेंडर “डिलिव्हर” दाखवून मोठा गैरप्रकार होत असल्याचा आरोप पुढे आला असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

तळोधी येथील मनोहर दोरखंडे यांनी थेट इंडियन ऑइलच्या एरिया सेल्स ऑफिसरकडे तक्रार दाखल करत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या नावावरील गॅस कनेक्शन क्रमांक 7093356263 वर 7 मे रोजी सिलेंडर बुक करण्यात आले होते. मात्र एजन्सीकडून “सिलेंडर उपलब्ध नाही” असे सांगून त्यांना रिकाम्या हाताने परत पाठवण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, दुसऱ्याच दिवशी मोबाईलवर सिलेंडर “डिलिव्हर” झाल्याचा संदेश आल्याचे उघड झाले.

इतकेच नव्हे तर 23 मार्च 2026 रोजीचे सिलेंडरही मोबाईलवर वितरित दाखवण्यात आले, मात्र प्रत्यक्षात ग्राहकाला ते कधीच मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दोरखंडे दाम्पत्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की,

“22 फेब्रुवारीनंतर आम्हाला एकही सिलेंडर मिळालेला नाही. दोन महिन्यांपासून आम्ही काड्यावर स्वयंपाक करत आहोत. आम्ही अशिक्षित असल्याने मोबाईलवरील मेसेज समजत नाहीत. एजन्सी कार्यालयातील लोकच आमच्या मोबाईलवरून बुकिंग करतात आणि आमच्या नावाने सिलेंडर उचलले जात आहेत.”

या प्रकरणात एजन्सी कर्मचाऱ्यांकडून उद्धट वागणूक दिली जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

“तुला देणार कुठून? ज्यांना काय करायचे ते करून घ्या,”

अशा शब्दांत बोलले जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सोनुर्ली येथील ग्राहक उंदरू बांदुरकर यांनी देखील याच प्रकाराची तक्रार केली आहे.

“28 मार्च रोजी माझ्या नावाचे सिलेंडर डिलिव्हर दाखवत आहेत, पण सिलेंडर मिळालेच नाही. पंधरा दिवसांपासून एजन्सीच्या चकरा मारतोय. विक्री अधिकाऱ्याकडे तक्रार करूनही काहीच होत नाही,” असे त्यांनी सांगितले.

तर शकुंतला मनोहर दोरखंडे यांनी संताप व्यक्त करत म्हटले की,

“गॅस नसल्याने दोन महिन्यांपासून लाकडे पेटवून स्वयंपाक करत आहोत. आमची अशिक्षितपणाचा फायदा घेत फसवणूक करण्यात आली.”

या सर्व प्रकारामुळे गरीब ग्राहकांच्या नावाने सिलेंडर उचलून काळाबाजार तर होत नाही ना? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. काही निवडक ग्राहकांना घरपोच सिलेंडर दिले जात असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच प्रलंबित सिलेंडर तात्काळ घरपोच देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तक्रारीची प्रत कोरपना तहसीलदार तसेच चंद्रपूर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनाही देण्यात आली आहे.

बातमी संकलन : सतीश जमदाडे, कोरपना 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत