ज्या गोजुबावीत अजितदादांचं विमान कोसळलं, तिथेच पुन्हा दुसरं विमान कोसळल्याने खळबळ
बारामती डेथ ट्रॅप बनतंय का ? ज्या गोजुबावीत अजितदादांचं विमान कोसळलं, तिथेच पुन्हा दुसरं विमान कोसळल्याने खळबळ;
चौकशीचे अहवाल गेले कुठे?
महा घडामोडी न्यूज नेटवर्क, पुणे/बारामती : पुण्याच्या बारामतीमधून पुन्हा एकदा अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. नेहमीप्रमाणे सरावासाठी उड्डाण केलेले एक शिकाऊ विमान गोजुबावी गावच्या हद्दीत तांत्रिक बिघाडामुळे कोसळले. सुदैवाने या अपघातात रेडबर्ड एव्हीएशन कंपनीचा प्रशिक्षणार्थी पायलट सुरक्षित बचावला आहे. मात्र, ज्या गोजुबावी गावच्या हद्दीत अवघ्या काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता, अगदी त्याच जागी हा दुसरा अपघात घडल्याने आता सुरक्षेबाबत गंभीर आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या लागोपाठच्या अपघातांमुळे आता संपूर्ण महाराष्ट्रातून नागरी उड्डाण मंत्रालय आणि स्थानिक प्रशासनाला खडे सवाल विचारले जात आहेत.
सवाल नंबर १: वर्षभरात दोन अपघात; चूक कोणाची? एअरपोर्टची, रनवेची की पायलटची?
एकाच भागात आणि एकाच धावपट्टीच्या परिसरात अवघ्या काही महिन्यांच्या अंतराने दोन विमाने कोसळतात, हा केवळ योगायोग असूच शकत नाही. बारामती विमानतळाची रचना 'टेबल टॉप' धावपट्टीसारखी असल्याने इथे लँडिंग करणे आव्हानात्मक मानले जाते. मग असे असताना तिथे वारंवार तांत्रिक बिघाड कसे होतात? विमानतळाच्या तांत्रिक यंत्रणेत त्रुटी आहेत, धावपट्टीच्या रचनेत काही दोष आहे, की पायलटच्या प्रशिक्षणात आणि अनुभवात कमतरता पडत आहे? तिथे नेमकं घडतंय तरी काय, याचे उत्तर देणार कोण?
सवाल नंबर २: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाताची चौकशी अजूनही अपूर्णच?
२८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या ज्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्राने आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच निष्पाप जीव गमावले, त्या राष्ट्रीय पातळीवरील संवेदनशील घटनेची चौकशी अजून कुठेपर्यंत पोहोचली? त्या अपघाताचा अंतिम तपास अहवाल अद्याप सार्वजनिक का करण्यात आलेला नाही? जर त्या व्हीआयपी अपघातानंतर तातडीने कठोर सुरक्षा पावले उचलली गेली असती, तर आज पुन्हा त्याच जागी हा दुसरा अपघात घडला असता का, असा संतप्त प्रश्न जनता विचारत आहे.
सवाल नंबर ३: रेडबर्ड अकॅडमीच्या विमानांचे वारंवार अपघात; तरीही कारभार सुरूच?
बारामतीत वैमानिक प्रशिक्षण देणाऱ्या कंपन्यांच्या सुरक्षेचा ट्रॅक रेकॉर्ड आधीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात आहे. यापूर्वीही 'रेडबर्ड' कंपनीच्या विमानांचे याच परिसरात अनेक अपघात झाले असून त्यांच्यावर तात्पुरती बंदीही घालण्यात आली होती. तरीही कोणतीही ठोस सुधारणा न करता या डळमळीत यंत्रणेच्या भरवशावर नवख्या पायलटचे जीव धोक्यात का घातले जात आहेत? डीजीसीए (DGCA) या गंभीर हलगर्जीपणाकडे डोळेझाक का करत आहे?
आता तरी सरकार जागे होणार का?
अजितदादांच्या अपघाताची चौकशी अजूनही अंधारात असताना या दुसऱ्या अपघाताची तरी निष्पक्ष आणि सखोल चौकशी होणार का, की हा विषयही कागदी घोड्यांमध्ये दडपला जाणार? एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या गंभीर घटनांमुळे बारामतीचे आकाशातील हे प्रशिक्षण क्षेत्र आता विमानांसाठी 'डेथ ट्रॅप' ठरत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत