Breaking News

रस्त्यासाठी पुन्हा एकदा पालगावकरांचे आक्रमक आंदोलन


"आश्वासन फसवंच ठरलं – पालगावकरांचा संतप्त एल्गार!"

"स्वातंत्र्यानंतरही रस्त्याची प्रतीक्षा – आमदारांसह ग्रामस्थांचे आंदोलन"

"पालगावचे आक्रोश पुन्हा रस्त्यावर – अल्ट्राटेकला धडा शिकवणार?"

आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन

महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी | (चंद्रपूर) कोरपना : गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधा म्हणून असणाऱ्या रस्त्याचा अभाव पालगाव ग्रामस्थांसाठी मोठी समस्या बनली आहे. याच मागणीसाठी ग्रामस्थांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत आज (२३ जून) अल्ट्राटेक सिमेंट कंपनी, आवाळपूरच्या नांदा येथील प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे आणि पालगावचे सरपंच अरुण रागीट यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे.

पालगाव हे अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे दत्तक गाव असूनही येथे रस्त्यासारखी मूलभूत सुविधा नाही. या रस्त्याअभावी ग्रामस्थांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. याअगोदर दिनांक ५ मे रोजीही ग्रामस्थांनी याच ठिकाणी आंदोलन केले होते. त्यावेळी तीन दिवसांच्या आंदोलनानंतर कंपनी प्रशासन नरमले आणि ३० मे पर्यंत पालगाव ते अल्ट्राटेक असा रस्ता तयार करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु जून महिना संपत आला तरी कामाला कोणतीही सुरुवात झाली नसल्याने ग्रामस्थांत तीव्र नाराजी पसरली आहे.

आमदार भोंगळे यांनी यासंदर्भात सांगितले, "आम्ही कंपनीकडून वेळोवेळी पत्रव्यवहार, बैठकांद्वारे संवाद साधला. कंपनीने आश्वासन दिले, परंतु प्रत्यक्षात काहीच झाले नाही. हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण असेल जिथे एखाद्या लोकप्रतिनिधीला दोन वेळा आंदोलन करावे लागते. ही बाब अत्यंत खेदजनक आहे."

ग्रामस्थांनी यावेळी कामगारांच्या समस्यांचाही मुद्दा उपस्थित केला आहे. अल्ट्राटेक कंपनीने पालगाव ते मायन्सदरम्यान रस्ता तयार करण्याचे मान्य केले होते, तसेच स्थानिक कामगारांच्या अडचणी सोडवण्याचाही शब्द दिला होता. परंतु कंपनीकडून केवळ आश्वासने आणि वेळकाढूपणाच दिसून येत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत