जिवती तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांचे हाल — रेतीअभावी बांधकाम ठप्प, शासनाच्या घोषणेला हरताळ
रेती अभावी जिवती तालुक्यातील घरकुलाचे काम थंड बसत्यात अनेक लाभार्थी उघड्यावर
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी | हकानी शेख | जिवती (चंद्रपूर) : जिवती तालुक्यातील अनेक गरीब कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांतून घरकुल मंजूर झाले असले तरी प्रत्यक्षात त्यांचे घर बांधण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे — बांधकामासाठी आवश्यक असलेली रेती उपलब्ध न होणे. शासनाने मोफत रेती देण्याची मोठी घोषणा केली होती, परंतु ही घोषणा आजतागायत केवळ कागदोपत्रीच राहिलेली आहे.
जुने घर तोडून नव्याची वाट पाहात उघड्यावर संसार
अनेक लाभार्थ्यांनी नवीन घरकुल बांधण्यासाठी आपल्या जुन्या झोपड्या किंवा घर तोडून टाकल्या. काहींनी बांधकामाला सुरुवात केली, परंतु रेती अभावामुळे काम थांबवावे लागले. काही लाभार्थ्यांनी तर काम सुरू करण्याचे धाडसच केलेले नाही. यामुळे आता पावसाळ्यात हे कुटुंबीय उघड्यावर संसार करत आहेत. अर्धवट पडलेली घरकुले आणि ओल्या हवामानात राहत असलेल्या महिलांचे, लहानग्यांचे हाल सुरु आहेत.
शासनाच्या मोफत रेती घोषणेला ब्रेक?
राज्य शासनाकडून महसूल मंत्र्यांनी जाहीर केले होते की, घरकुल लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी मोफत रेती उपलब्ध करून दिली जाईल. परंतु जिवती तालुक्यातील परिस्थिती पाहता ही घोषणा पूर्णतः फसवी ठरत आहे. तालुक्यात एकाही लाभार्थ्याला आजपर्यंत मोफत रेती मिळालेली नाही.
जिवती तालुक्यात अधिकृत रेती घाटच नसल्याने बांधकामासाठी लागणारी रेती मिळवणे ही सर्वात मोठी अडचण ठरली आहे. खाजगी विक्रेत्यांकडून रेती खरेदी करणे हे गरीब लाभार्थ्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे.
बांधकाम साहित्य महागले, निधी अपुरा
घरकुलासाठी शासनाकडून दिला जाणारा निधीही सध्याच्या महागाईच्या तुलनेत खूपच अपुरा पडत आहे. सिमेंट, लोखंड, विटा यासारख्या साहित्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत लाभार्थ्यांकडे ना रेती, ना पुरेसा निधी, ना शासनाची साथ – या तिहेरी संकटामुळे अनेकांचे घरकुल स्वप्न भंगले आहे.
अडचणीत लाभार्थी – लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज
जिवती तालुक्यात सुमारे ९५ टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. सध्या शेतमालाच्या कामात गुंतलेल्या लाभार्थ्यांना घरबांधणीकडे लक्ष देणेही शक्य होत नाही. पावसामुळे कामांना अडथळा येत असतानाच प्रशासनाचेही दुर्लक्ष दिसून येत आहे.
तत्काळ उपाययोजना करावी – जोरदार मागणी
या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार, खासदार, पालकमंत्री, महसूल मंत्री तसेच जिल्हा प्रशासन यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जिवती तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना तत्काळ मोफत रेती उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी सध्या जोर धरत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत