महसूल सप्ताहास कोरपना येथे उत्साही प्रारंभ – तहसीलदार पल्लवी आखरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर, कोरपना : दरवर्षीप्रमाणे १ ऑगस्ट रोजी "महसूल दिन" उत्साहात साजरा करण्यात आला असून, यानिमित्ताने राजुरा उपविभागात १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत "महसूल सप्ताह २०२५" साजरा केला जात आहे.
महसूल सप्ताहाचा प्रारंभ कोरपना तहसील कार्यालयाच्या सभागृहात झाला. याप्रसंगी तहसीलदार पल्लवी आखरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. उद्घाटन समारंभात कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर, तसेच कार्यक्षम अधिकारी-कर्मचारी सन्मान सोहळा, आणि लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
महसूल सप्ताहातील प्रमुख उपक्रम:
२ ऑगस्ट:
अतिक्रमण नियमनासाठी पात्र कुटुंबांना अतिक्रमित भूखंडांचे पट्टे वाटप करण्यात येणार असून, यासाठी राजुरा उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार, उपअधीक्षक भूमिअभिलेख, गटविकास अधिकारी, नगर परिषद/नगर पंचायत प्रमुखांच्या उपस्थितीत आढावा बैठक होणार आहे.
३ ऑगस्ट:
गावांमध्ये पांदन रस्त्यांची साफसफाई, दुहेरी बाजूंनी वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
४ ऑगस्ट:
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान मंडळ पातळीवर राबविण्यात येईल.
५ ऑगस्ट:
विशेष सहाय्य योजनेतील DBT पोर्टलवरील आधार व्हॅलिडेशन व मॅपिंग अपूर्ण लाभार्थ्यांना घरोघरी जाऊन माहिती देणे व पंचनामे करणे.
६ ऑगस्ट:
तालुक्यातील शासकीय जमिनीवरील अनधिकृत अतिक्रमण व अटींचा भंग झालेल्या भूखंडांबाबत तक्रारींचे निराकरण करून कायदेशीर कारवाई.
७ ऑगस्ट:
"एम-सँड धोरण" व नवीन एसओपी (SOP) प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी, तसेच महसूल सप्ताहाचा समारोप समारंभ होणार असल्याची माहिती तहसीलदार पल्लवी आखरे यांनी दिली.
बातमी संकलन : सतीश जमदाडे, नांदा फाटा
__________________••|||••_____________________
"महसूल सप्ताह 2025" ला राजुरा तालुक्यात उत्साही सुरुवात — माननीय आमदार देवराव भोंगळे आणि तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड यांचे नेतृत्व
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी सुवर्णा बेले, राजुरा : महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या निर्देशानुसार आणि महसूलमंत्री यांच्या आदेशानुसार “महसूल दिन” दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा करण्यात आला असून, त्यानिमित्ताने राजुरा तालुक्यात १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत "महसूल सप्ताह २०२५" विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे.
महसूल सप्ताहाचा शुभारंभ राजुरा उपविभागीय कार्यालयाच्या सभागृहात, मा. आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी राजुरा तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड यांनी सप्ताहात होणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
प्रारंभी, महसूल दिनानिमित्त सर्व शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांची आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी महसूल विभागातील कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आणि विविध योजनांतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
महसूल सप्ताह २०२५ – आठवडाभराचे विविध उपक्रम
२ ऑगस्ट:
अतिक्रमण पट्टा वाटपासंदर्भातील आढावा बैठक उपविभागीय कार्यालय, राजुरा येथे पार पडणार आहे. यामध्ये राजुरा, कोरपना, जिवती तालुक्यांतील तहसीलदार, भूमिअभिलेख अधिकारी, गटविकास अधिकारी व नगर परिषद/पंचायत अधिकारी सहभागी होणार आहेत.
३ ऑगस्ट:
राजुरा तालुक्यातील चनाखा, विहीरगांव, वरुर, सोंडो, चुनाळा, माथरा, सिर्सी व साखरवाही या गावांमध्ये पांदन रस्ते दुरुस्ती आणि दुहेरी वृक्षारोपण उपक्रम सरपंचांच्या उपस्थितीत राबविले जातील. तालुक्यातील प्रत्येक मंडळात ही मोहिम राबवण्यात येणार आहे.
४ ऑगस्ट:
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत राजुरा, विरूर, देवाडा व गोवरी या गावांमध्ये दाखले व योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात येणार आहे.
५ ऑगस्ट:
राजुरा तालुक्यातील चिंचोली खुर्द, पांढरपौनी, विहीरगाव, विरुर स्टेशन, चुनाळा येथे DBT पोर्टलवरील आधार व्हॅलिडेशन व मॅपिंग अपूर्ण लाभार्थ्यांची घरोघरी भेट घेऊन कार्यवाही केली जाईल.
६ ऑगस्ट:
शासकीय जमिनींवरील अतिक्रमण व अटींचा भंग झालेल्या जमिनींबाबत प्राप्त तक्रारींचे निकाली निवारण करून अतिक्रमणे निष्कासित करण्याची प्रक्रिया राबवली जाईल.
७ ऑगस्ट:
महसूल सप्ताहाचा समारोप राजुरा येथे होणार आहे. यावेळी "M-Sand" धोरणाची प्रभावी अंमलबजावणी आणि नवीन SOP प्रक्रियेची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.
महसूल विभागाच्या सेवा जनतेच्या दारी
या संपूर्ण सप्ताहात राजुरा तहसील कार्यालयामार्फत हेल्पडेस्क, WhatsApp माहिती सेवा, माहितीपत्रके, स्थानिक प्रसारमाध्यमांद्वारे महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रत्येक दिवशी आयोजीत कार्यक्रमात ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस पाटील व कोतवाल यांचा सक्रीय सहभाग असणार आहे.
तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी महसूल सप्ताहात सहभागी व्हावे आणि शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत