"मृत्यूनंतरही नरकयातना!" — कोहपरा गावाच्या मोक्षधामाची दयनीय अवस्था
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, सुवर्णा बेले, राजुरा : तालुक्यातील कोहपरा गावातील मोक्षधामाची अवस्था सध्या अत्यंत दुर्दशाजनक झाली आहे. जिथे मृतात्म्यांना शांततेने अंतिम प्रवासासाठी स्थान मिळावे, त्या पवित्र स्थळी अपमान, अस्वच्छता आणि हालअपेष्टा यांची भयावह छाया पसरली आहे.
अंत्यसंस्कारासाठी उभारलेले शेड पूर्णपणे जीर्णावस्थेत असून त्याचे पत्रे गळून पडले आहेत. परिसराला संरक्षक भिंतींचा अभाव असून, पावसाळ्यात पाणी साचल्याने अंत्यसंस्कारात मोठा अडथळा निर्माण होतो. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना या वेळी मानवी समजूत, सन्मान आणि सहानुभूती मिळण्याऐवजी असुविधा आणि वेदनांचा सामना करावा लागत आहे.
गावकऱ्यांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे या समस्येकडे लक्ष वेधले असूनही आजतागायत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. 'स्वच्छ भारत' आणि 'सन्मानाने मृत्यू' या राष्ट्रीय संकल्पनांवर अशा परिस्थितीमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गावकऱ्यांनी संबंधित प्रशासन, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्याकडे मोक्षधामाची तातडीने डागडुजी, नव्या शेडची उभारणी व स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची जोरदार मागणी केली आहे.
"जीव गेला तरीही शांतता नाही; स्वच्छतेच्या नावावर गढूळ वास्तव!"
आता तरी प्रशासन जागं होऊन मृतांच्या सन्मानासाठी आणि जिवंतांच्या श्रद्धेसाठी हे आवश्यक पावले उचलणार का? की मृत्यूनंतरही माणूस नरकयातनाच भोगत राहणार?



कोणत्याही टिप्पण्या नाहीत