Breaking News

चंद्रपुरात महाकाली कॉलरी येथील तेलुगू स्मशानभूमीच्या जागेवर भूमाफियांचा डल्ला; मनसेने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

चंद्रपुरात महाकाली कॉलरी येथील तेलुगू स्मशानभूमीच्या जागेवर भूमाफियांचा डल्ला; मनसेने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार


महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : शहरातील महाकाली कॉलरी परिसरात तब्बल २०० वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या तेलुगू समाजाच्या स्मशानभूमीवर भूमाफियांनी डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या जागेसह लागून असलेल्या शासकीय जमिनीवर अवैध कब्जा करून तिची सर्रास विक्री सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव किशोर मडगूलवार यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

तक्रारीनुसार, मौजा चांदा येथील सर्वे क्रमांक ४१४ मधील ०.७६ हेक्टर शासकीय ‘झुडपी जंगल’ जमीन काही इसमांकडून खाजगी मालकीची असल्याचे भासवून बेकायदेशीरपणे विकली जात आहे. विशेष म्हणजे, हीच जमीन तेलुगू समाजाच्या पारंपरिक स्मशानभूमीला लागून असून, येथे अनेक पिढ्यांपासून अंत्यसंस्कार केले जात आहेत.

या प्रकरणातील सर्वात संतापजनक बाब म्हणजे, आरोपींनी जेसीबीच्या सहाय्याने स्मशानभूमीतील जुन्या समाधी उखडून टाकल्याचा आरोप आहे. यामुळे समाजाच्या भावना तीव्रपणे दुखावल्या असून, पूर्वजांच्या अस्थींची विटंबना झाल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.

मडगूलवार यांनी प्रशासनाकडे तात्काळ ‘मौका चौकशी’ करण्याची आणि संबंधित भूमाफियांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. या तक्रारीनंतर आता जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या वेळी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत