'ऑनलाइनच परीक्षा घ्या', विद्यार्थ्यांची शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेर घोषणाबाजी
'ऑनलाइनच परीक्षा घ्या', विद्यार्थ्यांची शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेर घोषणाबाजी
(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) मुंबई : कोरोनाची लाट ओसारल्यामुळे शाळा आणि महाविद्यालय आता सुरू होणार आहे. एकीकडे पालकांनी शाळा सुरू करण्याची मागणी केली आहे, तर दुसरीकडे ऑफलाइन परीक्षा सुरू होणार असल्यामुळे विद्यार्थी चांगलेच संतापले आहे. या विद्यार्थ्यांनी आज राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेरच आंदोलन पुकारले आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी परीक्षा या ऑफलाईन स्वरूपात घेतल्या जातील असा निर्णय घेतलेला होता. या निर्णयाच्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. वर्षभर ऑनलाइन शिकवण्यात आले, आणि आता ऑफलाइन परीक्षा का घेण्यात येत आहे? असा सवाल विद्यार्थ्यांनी केला असून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतल्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले आहे.
शेकडो विद्यार्थ्यांनी वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर जमले असून जोरदार घोषणाबाजी करत आहे. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार सुद्धा करावा लागला होता.
बीडमध्ये विद्यार्थ्यांनी काढली रॅली
तर दुसरीकडे, दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन न घेता ऑनलाईन घेण्यात याव्यात, अशी ही मागणी घेऊन बीडमध्ये विद्यार्थ्यांनी रॅली काढत जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे. राज्यात सुरू असलेल्या एसटी संपामुळे, गावखेड्यातील बस अद्यापही बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात शिक्षणासाठी येता येत नाही. जर खाजगी वाहनांनी यायचं म्हटलं तर वाहन वेळेवर मिळत नाही.
त्यामुळे ऑफलाइन परीक्षा घेतल्या तर आमचं शैक्षणिक नुकसान होऊ शकतं. यामुळे बोर्डाने ठरवलेले ऑफलाइन पेपर हे ऑनलाइन घेण्यात यावेत. ही मागणी घेऊन बीडमध्ये विद्यार्थ्यांनी रॅली काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत