जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनर आणि कारचा भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनर आणि कारचा भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू
(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) पुणे : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव कार आणि कंटेनरमध्ये धडक झाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कारला हा अपघात झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी दुभाजक ओलांडून थेट पलिकडच्या मार्गावर गेली. त्यानंतर समोरुन येणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक दिली असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघात झालेली ही गाडी हरियाणा पासिंगची असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात गाडीतील पाचही जणांचा मृत्यू झाला आहे. लोणावळा क्रॉस केल्यानंतर शिलाटणे गावाच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. अपघातग्रस्त गाडीतील नागरिकांना बाहेर काढण्यात आले. मात्र, दुर्दैवाने या अपघातात पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतकांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. या भीषण अपघातामुळे या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत