Breaking News

साप शेतकऱ्यांचा शत्रू नाही, मित्र आहे

 साप शेतकऱ्यांचा शत्रू नाही, मित्र आहे

 क्षेत्र सहाय्यक मुकेश श्यामकूवर यांचे प्रतिपादन 

 महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम, भंडारा : साप हा शेतकऱ्यांचा मित्र असून तो शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करणाऱ्या शत्रू पासून पीक वाचवतो. त्यामुळे तो शेतकऱ्यांचा मित्र ठरतो. पण साप दिसला की आपण त्याला कसलाही विचार न करता मारतो. साप विषारी किंवा बिनविषारी याची खात्री केली जात नाही. त्यामुळे सदर प्रकार घडतो आणि सापाच्या अनेक जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. साप दिसला की त्याला न मारता सर्पमित्रांना बोलावून जंगलात सोडावे. जेणे करून निसर्ग साखळी जतन करण्यास मदत होईल.

 असे प्रतिपादन किटाडी चे क्षेत्र सहाय्यक मुकेश श्यामकुवर यांनी जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय पालांदूर/चौरास येथे आयोजित वन्यजीव सप्ताहाअंतर्गत "वन्यजीव व सर्प संवर्धन" या विषयावर मार्गदर्शन करतांना आपले विचार व्यक्त केले. सापांच्या भारतात ३०७ जाती असून महाराष्ट्रात असलेल्या विषारी, निमविषारी व बिनविषारी सापांची सविस्तर माहिती सांगून सर्पदंश झाल्यास घ्यावयाची काळजी यावर क्षेत्र सहाय्यक मुकेश श्यामकुवर यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. 

वन विभाग भंडारा, वनपरिक्षेत्र अधिकारी अड्याळ अधिनस्त क्षेत्र सहाय्यक कार्यालय किटाडी चे वतीने १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर वन्यजीव सप्ताह सुरू आहे. विद्यार्थ्यांना सापाविषयी माहिती व्हावी. या करिता जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय पालांदूर/चौरास येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्राचार्य हिवराज मडावी, क्षेत्र सहाय्यक मुकेश श्यामकुवर, वनरक्षक एस.एल. कुंभरे, ए. यू. बडोले, 

सर्पमित्र समीर हेमने, आदेश गोंदोळे, प्रा. युवराज खोब्रागडे, संजय वासनिक, रवींद्र कोसरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वनरक्षक एस.एल. कुंभरे व सर्पमित्र समीर हेमने यांनी सापांबद्दल समाज गैरसमजाबाबद उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. युवराज खोब्रागडे तर आभार संजय वासनिक यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षिकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत