Breaking News

महसूल सप्ताह अंतर्गत नारंडा येथे अतिक्रमणमुक्त पाणंद रस्त्यांची मोजणी व वृक्षलागवड कार्यक्रम संपन्न

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर, कोरपना : राज्य शासनाच्या निर्देशानुसार १ ते ७ ऑगस्ट २०२५ दरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून ३ ऑगस्ट रोजी नारंडा (ता. कोरपना) येथे "पाणंद व शिवरस्त्यांची मोजणी करून अतिक्रमणमुक्त करणे व त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड" या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. देवरावदादा भोंगळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या सोबत तहसीलदार श्रीमती पल्लवी आखारे, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, तसेच स्थानिक प्रशासनाचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाअंतर्गत कोरपना तालुक्यातील प्रत्येक मंडळातील गावांमध्ये अतिक्रमणमुक्तीची मोहिम राबविण्यात आली. पाणंद व शिवरस्त्यांवरील अतिक्रमणांचे मोजमाप करून त्यांची मुक्तता करण्यात आली. यानंतर या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी झाडांची लागवड करण्यात आली.

झाडांची देखभाल आणि संरक्षणासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, शेजारील शेतकरी आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यात आला. लागवडीनंतर प्रत्येक झाडाची जबाबदारी संबंधित शेतकऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे, जेणेकरून दीर्घकालीन संवर्धन शक्य होईल. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास आणि पर्यावरणाचे संवर्धन एकत्र साधले गेले आहे, अशी नागरिकांमधून सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहे.

तसेच, याच कार्यक्रमात गावातील संजय गांधी निराधार योजना अंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मंजूरी आदेशाचे वाटप आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत