Breaking News

पारनेर-सुपा रोडवर मृत्यूंचा सापळा; खासदार-आमदार गप्प का...? : मनसे नेते अविनाश पवार

महा घडामोडी न्युज विशेष प्रतिनिधी, पारनेर : पारनेर-सुपा रोडची अक्षरशः चाळण झाली असून हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरत आहे. तरीदेखील पारनेर तालुक्यातील खासदार निलेश लंके आणि आमदार काशिनाथ दाते हे रोजच्या रोज याच मार्गाने प्रवास करूनही गप्प बसले आहेत, असा जाहीर सवाल मनसे नेते अविनाश पवार यांनी केला आहे.

पवार म्हणाले की, “दररोज आमदार-खासदार चार-चार वेळा या मार्गाने जातात, पण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ब्र शब्द उच्चारायलाही ते तयार नाहीत. हे पारनेर तालुक्याचं दुर्दैव आहे. तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी देखील मनमानी पद्धतीने काम करत असल्याचे या परिस्थितीतून स्पष्ट होते.”

सुपा एमआयडीसीमुळे या मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच पारनेर तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने शाळा, कॉलेज, तहसील कचेरीसह प्रवासी वाहतूक प्रचंड प्रमाणात सुरू असते. मात्र, रस्त्यांवर खोल खड्डे पडले असून अपघातांत नागरिकांचे जीव जात आहेत. काहींना अपंगत्व येऊन संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. तरीदेखील जनतेचे प्रतिनिधी असलेले खासदार-आमदार शांत बसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मनसे नेते पवार यांनी इशारा दिला की, “दोन दिवसांत रस्त्यावरील खड्डे बुजवले नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पारनेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात मनसे-स्टाईल आंदोलन उभारले जाईल.”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत