निकृष्ट दर्जाच्या सिमेंट काँक्रीट रोड कामावर ग्रामस्थांचा संताप
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष? खोदाई नाही, सोलिंग नाही… मग रस्ता टिकणार कसा?
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील निमणी गावात सध्या सुरू असलेल्या प्रमोद बुऱ्हाण ते धुणकी मार्गावरील सिमेंट काँक्रीट रोडच्या कामाबाबत गंभीर अनियमितता उघडकीस आली आहे. कामात मातीमिश्रीत रेती व गिट्टीचा वापर, कोणत्याही प्रकारचे कॉम्पेक्शन किंवा सोलिंग न करणे, तसेच कमी प्रमाणातील सिमेंट अशा प्रकारच्या घोर निष्काळजीपणाचा पुलिंगी दाखला ग्रामस्थांनी समोर आणला आहे.
आमदार स्थानिक विकास निधीतून ९.९० लाखांचा खर्च करून हा रस्ता तयार केला जात आहे. मात्र वास्तवात ना खोदाई, ना ८० एमएम गिट्टीचे खडीकरण, ना योग्य दर्जाची पीसीसी—तर मातीवरच थेट पीसीसी आणि त्यावरच दुर्लक्षित पद्धतीने आरसीसी घातल्याचे दिसत आहे. कामाच्या ठिकाणी आणलेला नीडल व्हायब्रेटर केवळ दिखाव्यासाठी असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.
“काँक्रीटचे एम-20 दर्जाचे प्रमाण तर पूर्णपणे बाजूला ठेवले आहे. कॉम्प्रेशन न केल्यामुळे हा रस्ता काही महिन्यातच खराब होईल,” असा आरोप माजी उपसरपंच उमेश राजुरकर यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाकडे उघडपणे दुर्लक्ष केले असून, संपूर्ण कामाची तातडीने चौकशी करून कंत्राटदार एजन्सी व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची ठाम मागणी आहे.
निमणी ग्रामस्थांचे म्हणणे एकच –
“असा रस्ता आम्हाला नको… शासनाचा पैसा आणि आमचे हक्काचे विकास काम वाया जाऊ देणार नाही!"
बातमी संपादन : उमेश राजुरकर, बाखर्डी



कोणत्याही टिप्पण्या नाहीत