शुभारंभाला पोहचण्या आधीच काळाने केला अक्षयचा घात
भरधाव मोटरसायकलची कारला जोरदार धडक
एकाचा मृत्यू दुसरा जखमी: बोरखेडी शिवारातील घटना
महा घडामोडी न्युज नेटवर्क बेला : लग्नाला जात असलेल्या तरुणांची मोटारसायकल टोलनाका चुकविण्याच्या नादात विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारवर धडकली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दोघांपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुटीबोरी (ता. नागपूर ग्रामीण) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर- चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील बोरखेडी शिवारात रविवारी (दि. २४) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
अक्षय मोहन जारुंडे (वय २४) असे मृत तरुणाचे, तर प्रणय रामदास खोडके (१८) असे गंभीर जखमीचे नाव आहे. दोघेही बेला, ता. उमरेड येथील रहिवासी आहेत. दोघेही लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी मोटारसायकल (एमएच ४९/बीएफ-०४६४) ने नागपूरच्या दिशेने निघाले होते. ते नागपूर- चंद्रपूर महामार्गावरील बोरखेडी (ता. नागपूर ग्रामीण) शिवारातील टोलनाक्याजवळ पोहोचताच विरुद्ध दिशेने वेगात येणाऱ्या कार (एमएच-३४/पीएफ ०९४२) ला धडकले. यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली. परिसरातील नागरिकांनी दोघांनाही लगेच बुटीबोरी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. अक्षयच्या डोके व मानेला गंभीर इजा झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रणयवर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. हा अपघात टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अपघात होताच कारचालक कारसह घटनास्थळाहून पळून गेला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अक्षयचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे बेला येथे शोककळा पसरली होती. याप्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत