Breaking News

बेल्यात शासन आपल्या दारी

 बेल्यात शासन आपल्या दारी

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, विनोद कुमार डांगरे, बेला : गोरगरीब व कष्टकरी जनतेला त्रास न होता त्यांचे वेळ व पैशाची बचत व्हावी. या उद्देशाने विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना एका ठिकाणी आणून जनतेच्या समस्यांचे वेळीच निराकरण करण्यासाठी शासन आपल्या दारी हे दोन दिवशीय शिबिर नुकतेच बेला येथे घेण्यात आले. सदर कार्यक्रमाचा जनतेनी लाभ घ्यावा.असे आवाहन यावेळी तहसीलदार संदीप पुंडेकर यांनी केले. ते बेला येथे ' शासकीय योजनांची जत्रा ' या कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी उमरेड पंचायत समितीच्या सभापती गीतांजली नागभीडकर होत्या. यावेळी जि.प.सदस्या वंदनाताई बालपांडे, अधिकारी नितेश माने, बेला येथील सरपंच अरुण बालपांडे, अप्पर तहसीलदार मनोज वाडे, नायब तहसीलदार राजेश्वर राऊत, आदी अधिकारी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

    राजस्व , शिक्षण, आरोग्य विभागाच्या योजना व अडीअडचणी तसेच जाती जमातीचे प्रमाणपत्र, श्रावणबाळ निराधार योजना , वन विभागाशी संबंधित कामे, विद्युत मंडळाच्या तक्रारी, भूमी अभिलेख , पट्टेवाटप संबंधित अर्ज विनंती, उत्पन्नाचा दाखले यावेळी गरजू नागरिकांना शिबिरातून वेळीच मिळाले. त्यामुळे बेला व परिसरातील नागरिकांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . राज्यात 14 एप्रिल ते 14 मे पर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमाला जनता मोठ्या संख्येने लाभ  घेत आहे. कार्यक्रमात अतिवृष्टी मध्ये झालेल्या घराचे नुकसानग्रस्त लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदान राशीचा धनादेशही वितरित करण्यात आला. याशिवाय श्रावण बाळ व इतर निराधार योजनेतील महिलांना निराधारचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडल निरीक्षक पंकज तांबे यांनी केले . खंडविकास अधिकारी माने यांनी प्रास्ताविक केले .

शिबिराचे यशस्वीतेसाठी पशुसंवर्धन चे डॉ. स्वप्नील सोनोने, डॉ. पवन भागवत, डॉ. मनीष पोके ,महसूल विभागाचे  अनिल राठोड, संजय राठोड, अतुल खडसे, संजय गुजर, रितेश सवाईथुल ,पियुष गांगुर्डे, पुंडलिक मांढरे, संदीप झिले व अनेक कर्मचाऱ्यांनी सहकार्य  केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत