Breaking News

जिवती पोलिसांची अवघ्या सहा तासांत धडक कारवाई: घरफोडीप्रकरणी आरोपी अटकेत, ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर, जिवती : गावाकडील साध्या, कष्टकरी कुटुंबाच्या घरात भरदिवसा झालेल्या चोरीची घटना काही तासांतच उघडकीस आणत जिवती पोलिसांनी पुन्हा एकदा त्यांच्या कार्यक्षमतेचा ठसा उमठवला आहे. करणकोडी गावातील रहिवासी साहेबराव बापुराव चव्हाण यांच्या घरात ११ जुलै २०२५ रोजी दुपारी चोरी झाली होती. याप्रकरणी फक्त सहा तासांच्या आत पोलिसांनी संशयित आरोपीस अटक करून ₹३५,००० किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

चोरीची घटना कशी घडली?

साहेबराव चव्हाण हे त्यांच्या कुटुंबासह शेती करतात. त्यांच्यासोबत पत्नी ऊषाताई, दोन मुलं, आई बहिनाबाई, वडील बापुराव आणि आजी रूक्माबाई हे सगळे एकत्र राहतात. घरातील टिनाच्या पेटीत (संदूक) ठेवलेले सोनं-चांदीचे दागिने आणि काही रोख रक्कम त्यांनी घरातच सुरक्षित ठेवले होते.

१० जुलै रोजी त्यांनी ₹१५०० आणि ₹३००० अशी एकूण ₹४५०० रोख पैसे आणि दागिने पेटीत ठेवल्याची खात्री केली होती. ११ जुलै रोजी सकाळी त्यांनी बिस्किट घेण्यासाठी पेटीतून ₹१०० काढले, तेव्हा सर्व काही सुरक्षित होतं. त्यानंतर सगळे शेतात कापसात निंदणासाठी गेले. पण दुपारी रणवीर या मुलाला ताप आल्याने वडील बापुराव त्याला घरी घेऊन आले. याच दरम्यान चोरी घडली, असा अंदाज आहे.

संध्याकाळी चारच्या सुमारास साहेबराव यांना त्यांच्या आत्या पारूबाई यांनी फोन करून माहिती दिली की, त्यांच्या घरी चोरी झाली आहे. तात्काळ ते घरी परतले आणि पाहिले असता टिनाच्या पेटीत ठेवलेले दागिने व पैसे गायब होते. पेटीतील डबे उघडलेले आणि बॅग हलवलेली होती.

चोरीस गेलेला मुद्देमाल:

साहेबराव यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, चोरीस गेलेला मुद्देमाल पुढीलप्रमाणे: चांदीचे २ दंडीकडम (४० ग्रॅम): ₹१४,०००, चांदीचे जोडवे (१० ग्रॅम): ₹१,०००, सोन्याची अंगठी (५ ग्रॅम): ₹१५,०००, सोन्याची बारी: ₹३,०००, रोख रक्कम: ₹२,९००, एकूण अंदाजे नुकसान: ₹३६,९००

याप्रकरणी त्यांनी नागे सुनील बाळू चव्हाण, रा. करणकोडी याच्यावर संशय व्यक्त केला. यावरून पोलिसांनी अप. क्र. 63/25, भा.दं.वि. कलम 305, 331 (3) अन्वये गुन्हा दाखल केला.

पोलीस यंत्रणेची तात्काळ कारवाई

तक्रार प्राप्त होताच पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे, गडचांदूरचे उपविभागीय अधिकारी रवींद्र जाधव, तसेच ठाणेदार सपोनि जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग दिला गेला. पोलीस पथकाने तत्काळ संशयिताच्या हालचालींचा मागोवा घेतला आणि अवघ्या सहा तासांतच आरोपीला अटक केली.

हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल:

पोलिसांनी एक चांदीची अंगठी, एक कानातील मणी, एक कोपऱ्या (हातात घालायचा दागिना) असा एकूण ₹३५,००० चा मुद्देमाल आरोपीकडून जप्त केला.

तपास पथकाची शाबासकीची कामगिरी

ही धडक कारवाई पो.शि. जगदीश मुंडे (ब.न. 1388), पो.शि. अतुल कानवटे (ब.न. 2058) आणि पो.शि. किरण वाठोरे (ब.न. 28) यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे शक्य झाली. ग्रामीण भागात पोलिसांनी इतक्या अल्पावधीत आरोपीला पकडून मुद्देमाल हस्तगत केल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे.

नागरिकांनी व्यक्त केला पोलिसांप्रती विश्वास

या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये पोलिसांबद्दलचा आदर आणि विश्वास वाढला आहे. गावकऱ्यांनी पोलीस यंत्रणेचे आभार मानले असून, गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच अटकाव केल्याबद्दल कौतुक केले आहे. अशा वेगवान आणि परिणामकारक तपासामुळे ग्रामीण भागातील जनतेला दिलासा मिळत आहे.

संपादकीय 

"गावातील कष्टकरी कुटुंबाच्या विश्वासाचा चोऱ्यांमुळे खचखचाट होत असतानाच, पोलिसांनी दाखवलेली तत्परता ही एक सकारात्मक आशा निर्माण करणारी बाब आहे. अशा घटनांवर वेळेत कारवाई होणे हीच जनतेच्या सुरक्षिततेची खरी हमी असते."


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत